एस.टी. च्या मालवाहतूक करणाऱ्या बसला भीषण आग

0
54

संपूर्ण बस पूर्णपणे जळून खाक; नगर-पुणे महामार्गावर शिरूरजवळील घटना

शरूर – नगर-पुणे महामार्गावर शिरूर शहराजवळ असलेल्या बोर्‍हाडे मळा परिसरात एस.टी. महामंडळाच्या मालवाहतूक करणार्‍या धावत्या बसला शुक्रवारी (दि.९) सकाळी ६ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या घटनेने नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सदरची बस ही बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर डेपोची होती. ती नगर मार्गे पुण्याकडे जात होती. सकाळी ६ च्या सुम ारास शिरूर शहराजवळ असलेल्या बोर्‍हाडे मळा परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतला. बसला आग लागलेली पाहून चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थांबवुन खाली उडी घेतली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे बसमधून आगीचे मोठ-मोठे लोळ बाहेर पडू लागले. ही घटना पाहून रस्त्याने जाणारे वाहनचालक वाहने थांबवुन पाहू लागले. थोड्याच वेळात तेथे मोठी गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी झाली.

काहींनी रांजणगाव एमआयडीसीतील अग्निशामक दलाला फोन करून माहिती दिली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी पडली होती. केवळ बसचा सांगाडा शिल्लक राहिला होता. शिरूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत एकेरी वाहतूक करून वाहतुकीची झालेली कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला. सदरची आग ही शॉर्ट सर्किटमुळे अथवा इंजिन गरम झाल्याने लागली असावी अशी शयता वर्तविण्यात येत आहे. बसमध्ये माल होता. तोही जळून खाक झाला आहे. या आगीत किती नुकसान झाले याची माहिती शिरूर पोलिस एस.टी. महामंडळाच्या मलकापूर डेपोच्या अधिकार्‍यांकडून घेत होते. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात जळीताची नोंद करण्यात आली आहे.