कच्चे मांस खाल्ल्यास काय होते?

0
58

कच्चे मांस खाल्ल्यास काय होते?

आदिमानव शिकार करायचा. सुरुवातीच्या काळात तो कच्चे मांस खायचा. आजही जगात काही भागात अत्यंत मागासलेल्या अशा आदिवासी जमातींमध्ये कच्चे मांस खाण्याची प्रथा आढळून येते. जसजशी प्रगती होत गेली त्यानुसार मानव चवीचवीने, विविध प्रकारे शिजवून/भाजून मांस खाऊ लागला. आज तर मांसाचे पदार्थ बहुतांश सर्वच हॉटेलांमध्ये उपलब्ध असतात व खवैय्ये या पदार्थांवर हात मारताना दिसतात. कच्चे मांस खाल्ल्यास अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. एक म्हणजे शिजवणे-भाजणे यामुळे अन्न पचायला सोपे होते. मसाल्यांच्या वापरामुळे ते चविष्ट बनते. अर्थात याहून महत्त्वाचे म्हणजे कच्चे मांस खाल्ल्याने आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. कच्चे मांस खाल्ल्याने आपल्याला टेपवर्म किंवा टेपकृमींचा संसर्ग होऊ शकतो. टिनिया सोलीयम, टिनीया सजायनाटा, ट्रिचिनॅलीस स्पायरॅलीस आणि फॅस्कीओला हेपॅटीका अशी या टेपकृमींची नावे आहेत. याखेरीज कच्चे मांस खाल्ल्याने अँथ्रॅस, अ‍ॅटीनोमायकोसीस (एक बुरशीजन्य रोग), प्राण्यांचा क्षयरोग तसेच अन्नविषबाधा इ. रोगही आपल्याला होऊ शकतात. आजकाल मुद्दाम तर कच्चे मांस कोणी खाणार नाही. पण हॉटेलमध्ये किंवा खूप लोक एकत्र जेवत असतील तशा ठिकाणी (खानावळ, लग्नाच्या मेजवान्या वगैरे) घाईगर्दीने मांस शिजवले जाण्याची शयता असते किंवा मोठ्या प्रमाणात पदार्थ बनवण्यासाठी रोगट जनावरांचे मांस वापरले जाण्याची शयता असते. त्यामुळे मांस खाणार्‍यांनी त्यांना अशा प्रकारे त्रास होणार नाही याची खात्री करणे आवश्यक ठरते. सर्वात चांगला उपाय म्हणजे एकतर घरीच मांसाहार करणे आणि अनोळखी किंवा खात्री नसेल त्या ठिकाणी मांसाहार टाळणे.