स्वस्तिक बसस्थानकातून २ महिलांचे दागिने चोरीस

0
55

नगर – शहरातील स्वस्तिक चौकाजवळ असलेल्या पुणे बस स्थानकातून एस टी बस मध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत २ महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. या बाबत शनिवारी (दि.३) आणि रविवारी (दि.४) २ वेगवेगळे गुन्हे कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. शनिवारी कावेरी अच्युत शुक्रे (वय ७२, रा. सिध्दीविनायक मनस्वी दत्त नगर, आंबेगाव रस्ता, कात्रज, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी १० वर्षांपासून पुण्यात राहतात. त्या मुळच्या भिंगारच्या आहेत. त्या ३० जानेवारी रोजी कामानिमित्त मुलासह भिंगार येथे आल्या होत्या. काम झाल्यानंतर ते पुन्हा पुणे येथे जाण्यासाठी दुपारी पावणे तीन वाजता नगर शहरातील पुणे स्थानकावर आले व तेथुन ते श्रीरामपूर- पुणे बसने पुण्याकडे जात असताना सुपा (ता. पारनेर) येथे गेल्यानंतर गळ्यातील मिनी गंठण त्यांना दिसले नाही. त्यांनी याची माहिती बसच्या वाहकाला दिली. परंतू बसमध्ये मिनी गंठण मिळून आले नाही. ते दोघे माय-लेक पुणे येथे गेले. दरम्यान शनिवारी (दि.३) फिर्यादी यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दागिने चोरीची दुसरी घटना रविवारी (दि.४) दुपारी ४.४० च्या सुमारास घडली आहे. याबाबत सौ. शोभा सतीश मंडलेचा (वय ५५, रा. आळंदी, पुणे) यांनी सायंकाळी फिर्याद दिली आहे. मंडलेचा या कामानिमित्त नगरला आल्या होत्या. दुपारी पुन्हा पुण्याकडे जाण्यासाठी बसस्थानकावर गेल्यावर बस मध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरले. दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.