पत्नीनेच दिली होती पतीच्या खुनाची सुपारी कोथुळ (ता.श्रीगोंदा) येथील खुनाचा लागला छडा

0
60

कोथुळ (ता.श्रीगोंदा) येथील खुनाचा लागला छडा

अहमदनगर – श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळ येथे मंगळवारी (दि.३०) पहाटे योगेश सुभाष शेळके यांचा अज्ञात ४ व्यक्तीने घरात घुसून पत्नीच्या समोर त्यांचे गळ्यावर, हातावर, उजव्या पायावर कोयत्याने वार करुन खून केला होता. या खुनाच्या गुन्ह्याचा अखेर नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला असून मयताच्या पत्नीनेच आपल्या खुनाची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी तिच्या प्रियकरासह ६ आरोपींना पुण्यात बेड्या ठोकल्या आहेत.
मयत योगेश सुभाष शेळके यांच्या खून प्रकरणी त्यांची पत्नी आरती योगेश शेळके हिने दिलेल्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, स.फौ.बबन मखरे, पो.हे.कॉ.बापुसाहेब फोलाणे, रविंद्र कर्डीले, पो.ना.फुरकान शेख, पो.कॉ.रविंद्र घुगांसे, मच्छिंद्र बर्डे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, रोहित मिसाळ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, देवेंद्र शेलार, आकाश काळे, महिला पो.ना.भाग्यश्री भिटे, सोनाली साठे, ज्योती शिंदे, चालक उमाकांत गावडे, संभाजी कोतकर व भरत बुधवंत यांची २ विशेष पथके करत होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन्ही पथकांनी घटनास्थळाची पहाणी करुन आजु बाजूला विचारपुस केली असता घटनाक्रम पहाता फिर्यादीवरच पथकाचा संशय बळावला होता. परंतु सुरुवातीला तांत्रिक विश्लेषणात घटनेला कोणताही आधार मिळत नसल्याने मयताचे घरी नेहमी येणारे तसेच त्याचे सोबत दारु पिणारे ४ ते ५ इसमांना पथकाने ताब्यात घेतले होते. फिर्यादी पत्नी आरती हिनेपण वरील ताब्यात घेतलेल्या इसमांचा समावेश असल्याचे सांगुन पथकाची दिशाभुल केली होती. तरीही पथकाला घटनेचे सत्यते बाबत तसेच फिर्यादी सांगत असलेल्या आरोपीं बाबत खात्री पटत नव्हती.
त्यामुळे साधारण दोन दिवस कोथुळ गावातुन माहिती गोळा करताना तसेच तांत्रिक विश्लेषणा दरम्यान मयताचा भाचा शुभम लगड याचे मोबाईलवर रोहीत साहेबराव लाटे (वय २३, रा. कोथुळ, हल्ली मुक्काम पुणे) याचा घटनेच्या दिवशी सकाळी कॉल आलेला दिसुन आला. त्या प्रमाणे पथकाने पुणे येथे जावुन रोहीत लाटे याला विश्वासात घेवुन त्याचेकडे विचारपुस केली. त्यावेळी त्याने मयताची पत्नी आरती व त्याचे प्रेमाचे संबंध होते.

त्यावरुन मयत योगेश हा त्यांच्या अनैतिक संबंधाचे संशयावरुन आरतीस नेहमी दारु पिऊन शिवीगाळ व मारहाण करीत असल्याने दोघांनी मागिल १५ दिवसा पुर्वी पासुन नियोजन करुन अनिश सुरेंद्र धडे (वय १९, रा. पुणे) याचे मध्यस्थीने पृथ्वीराज अनिल साळवे (वय १९), विराज सतिष गाडे (वय १९), शोएब महमंद बादशाह (वय २२) व आयुष शंभु सिंह (वय १८) यांना दिड लाख रुपये देण्याचे कबुल करुन त्यांचे मदतीने २ मोटार सायकलवर त्यांचेसह येवुन खुन केल्याचे सांगितले. तसेच रोहीत व आरती यांचेतील संबंधाची कोणाला माहिती मिळु नये म्हणुन स्नॅपचॅट या सोशल मिडीया ऍ़पचा वापर करुन ते संपर्क साधत असल्याचे निष्पन्न झाले होते. वर नमुद आरोपींचा शोध घेता ते मिळुन आल्याने त्यांना विविध ठिकाणावरुन ताब्यात घेतले.
या गुन्ह्यातील एकूण आरोपींची संख्या ७ झाली असून आरोपी आरती योगेश शेळके, रोहीत साहेबराव लाटे, (दोन्ही रा. कोथुळ, ता. श्रीगोंदा), शोएब महमंद बादशाह (रा. सेक्टर डी लाईन, ट्रॉम्बे, मुंबई), विराज सतिष गाडे (रा. सोलापुर बाजार, कॅम्प पुणे), आयुष शंभु सिंह, पृथ्वीराज अनिल साळवे, अनिश सुरेंद्र धडे (तिन्ही रा. घोरपडे पेठ, पुणे) या सर्वांना बेलवंडी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन करीत आहेत.