शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती करा अन्यथा ८ फेब्रुवारीपासून महापालिकेसमोर उपोषण

0
43

नगर – शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरावस्था झालेली असून सर्व स्वच्छतागृहे तातडीने स्वच्छ करण्यात येवून तेथील फुटलेले पाण्याचे पाईप व बंद बेसिन पूर्ववत वापरण्यायोग्य करावेत अन्यथा ८ फेब्रुवारीपासून महापालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा मनसेच्यावतीने देण्यात आला आहे. यासंदर्भात मनसेचे विभाग अध्यक्ष किरण रोकडे यांनी महापालिका आयुक्तांना स्मरण पत्र दिले असून यात म्हंटले आहे की, या पूर्वी २ जानेवारीला सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ करण्याबाबत निवेदन दिले होते. तरी आपण आजपर्यंत सदर निवेदनाची कुठल्याही प्रकारची नोंद घेतलेली नाही. त्यामुळे नागरिकांना स्वच्छतागृहाअभावी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मागणी करण्यात येत आहे की, सार्वजनिक स्वच्छतागृहे ही २४ तास चालू असावीत.

जुने सर्व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी. महिलांना स्वच्छतागृहाचा वापर हा मोफत असून देखील त्याच्याकडून पैसे घेतले जात आहे ते मोफत करुन द्यावे. स्वच्छतागृहात २४ तास पाणी उपलब्ध करावे. स्वच्छतागृहातील फुटलेले पाण्याचे पाईप व बंद पडलेले बेसिन हे पूर्ववत वापरण्यायोग्य करावे. वरील मागण्यांवर आपण आठवड्याभरात कारवाई करावी तसे न झाल्यास ८ फेब्रुवारी पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने महापालिकेच्या आवारात उपोषण करण्यात येईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.