मंदिर परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन

0
40

नगर – नगर शहर परिसरात हिंदु मंदिर परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेने तातडीने कारवाई करत त्या मंदिरांचा जीर्णो ध्दार व सुशोभिकरण करावे अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल व पुढील होणार्‍या परिस्थितीस सर्वस्वी जबाबदार महापालिका व पोलिस प्रशासन असेल, इशारा बजरंग दलाच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेवून निवेदन दिले. यामध्ये म्हटले आहे की, मुकुंदनगर भागातील इंडिया बेकरी समोरील श्री पावन दत्त मंदिर हे जुने व पुरातन मंदिर असून या मंदिराच्या असलेल्या जागेच्या परिसरामध्ये अतिक्रमण करुन बांधकाम करण्यात आलेले असून या मंदिराची जागा हडपुन या मंदिराच्या पावित्र्याला धोका निर्माण होत आहे. याबाबत तातडीने कारवाई करुन संबंधीत बांधकाम काढण्यात यावे व मुकुंदनगर भागातील शांतीधाम मंदिर हे सुध्दा पुरातन व जुने मंदिर असून महानगरपालिकेच्या जागेत हे मंदिर असल्याने या मंदिराच्या बाबतीत १६ फेब्रुवारी २०२२ रोजी बजरंग दलाने निवेदन दिलेले होते.

या मंदिरामध्ये त्या भागातील गुंडांकडून मंदिराच्या जागेत अतिक्रमण करणे, तसेच ड्रेनेजचे पाणी सोडणे, कचरा आणून टाकणे, मांसाचे तुकडे टाकणे असे मंदिराच्या पावित्र्याला धोका निर्माण होऊन मंदिराच्या जागेवरती कब्जा करण्याच्या उद्देशाने व तेथील हिंदु बांधवांना हाकलून लावण्याचे हे षडयंत्र आहे. हे सातत्याने अनेक वर्षापासून चालु आहे. संबंधीत विषयामध्ये तातडीने कारवाई करुन मंदिराचा जीर्णोध्दार करुन वॉल कंपाऊंड बांधून त्या ठिकाणी सुशोभिकरण करावे व मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करावी. तसेच संबंधीत समाज कंटकांवर त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा बजरंग दल तीव्र स्वरुपाचे आंदोलन उभारेल व पुढील होणार्‍या परिस्थितीस सर्वस्वी जबाबदार महानगरपालिका व पोलिस प्रशासन असेल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.