डासांपासून बचाव करण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय कोणता?

0
63

डासांपासून बचाव करण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय कोणता?

डासांपासून बचाव करण्यासाठी अनेक उपाय आहेत. डासांची पैदास जेथे होते त्या जागांवर किटकनाशके फवारून त्यांचा नायनाट करणे, हा प्रभावी उपाय असला तरी शहरांमध्ये वा खूप डास असलेल्या ठिकाणी स्वतःचे रक्षण करण्यासाठी काय करावे; हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. डासांच्या चाव्यापासून तुमचे रक्षण व्हावे, यासाठी अनेक उपाय आहेत. कडूनिंबाच्या पाल्याचा धूर करणे व नंतर दारेखिडया उघडून धूर बाहेर काढणे यात धुरामुळे डास पळून जातात. पण ते परत येतात. कासव छापसारख्या अगरबत्त्या रात्रभर लावून ठेवल्यासही धूर होतो व डास पळून जातात; पण आपल्याही फुप्फुसात धूर जातो व खोकला, दम्याचा त्रास असलेल्यांना दम्याचा झटका येऊ शकतो. फुप्फुसाच्या कर्करोगाची शयताही असते. असे काही शास्त्रीय अभ्यासामध्ये दाखवण्यात आले आहे. (अर्थात यावर संशोधन चालू आहे) काही तेले अंगाला लावल्यास डास चावत नाहीत; पण याची किंमत लक्षात घेता व अंगाला तेल लावून झोपण्यातील अडचणींचा विचार करता ही पद्धतही योग्य ठरत नाही. गुडनाईट, ओडोमॉससारख्या वड्या आजकाल बाजारात मिळतात त्यात रासायनिक पदार्थ असतात. ते श्वसनावाटे आपल्या शरीरात जातात. सध्या हे पदार्थ सुरक्षित समजले जातात; पण २५ वा ५० वर्षानंतरच्या वापराने काही दुष्परिणाम होत नसतील असे कोणालाच सांगता येत नाही. तसेच महिन्याला ४० ते ५० रूपये खर्च येईल तो वेगळाच. मग काय करायचे? डासांना चावू द्यायचे की काय? काळजी करू नका. डासांच्या चाव्यापासून वाचण्याचा सुरक्षित, सोपा व कमी खर्चाचा असा एक मार्ग आहे. तो म्हणजे मच्छरदाणी वापरणे. एकदा मच्छरदाणी आणली की मग कोणताच खर्च नको. रासायनिक पदार्थांच्या व धुराच्या दुष्परिणामांची चिंता नको व अंगाला तेल लावून कसेसेच वाटायला नको! डासही चावणार नाहीत व आरोग्यही नीट राहील.