खूप खेळल्यावर घाम का येतो ?
खूप खेळल्याने, धावल्याने व्यायाम होतो. शरीरातील स्नायूंचे मोठ्या प्रमाणावर आकुंचनय्प्रसरण होते. स्नायूंचे कार्य वाढते. साहजिकच या भौतिक श्रमांमुळे उष्णता निर्माण होते. अशा परिस्थितीत शरीराचे तापमान ठराविक पातळीवर स्थिर राहण्यासाठी शरीरातून उष्णता बाहेर टाकण्याची आवश्यकता असते. व्यायामामुळे निर्माण झालेल्या उष्णतेच्या परिणामाने
त्वचेखालचा रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे त्वचेचे तापमान हवेच्या तापमानापेक्षा जास्त होते व काही उष्णता वातावरणात सोडली जाते; परंतु उष्णतेतील ह्या मार्गाने होणारी घट अल्प प्रमाणातच असते. व्यायामानंतर निर्माण होणारी उष्णता शरीराबाहेर टाकण्याचा महत्त्वाचा मार्ग घाम हाच होय. खूप व्यायाम केल्यानंतर घाम येण्याचे प्रमाण वाढते व त्याबरोबरच घामाचे बाष्पीभवन होण्याचेही प्रमाण वाढते. शरीरातील वाढलेली उष्णता व मेंदूतील प्रेरणा या दोहोंमुळे व्यायामानंतर
आपल्याला खूप घाम येतो. विश्रांती घेतल्यावर हळूहळू घाम येण्याचे प्रमाण कमी होते. अशा प्रकारे घाम आल्याने शरीरात निर्माण झालेली उष्णता शरीरा बाहेर टाकली जाते व शरीराचे तापमान सामान्य पातळीत राहते. त्यामुळेच खूप व्यायाम
केल्यावर घाम येतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घाम आणखीनच येतो व हिवाळ्यात तेवढाच व्यायाम करून घाम कमी येतो, याचा अनुभव तुम्ही घेतला असेल.