शिकवण साधूची

0
76

शिकवण साधूची

एका गावाच्या भोवती जंगल होतं. त्या जंगलातून एक पायवाट शहराकडे जात होती. बाजारहाट किंवा राजाच्या दरबारी नोकरीस जाताना गावकर्‍यांना याच पायवाटेवरून जावे लागे. काही दिवसांनी अतिशय विषारी व मोठा नागराज त्या जंगलातील पायवाटेवर आडवा पडून राहू लागला. त्याने अनेकांना दंश केला. बरीच माणसं दगावली, त्यामुळे त्या नागराजाबद्दलची दहशत वाढली. एक साधू त्या पायवाटेवरून निघाला असता, त्याला त्या नागराजाने दंश केला. तरी तो साधू उभाच! म्हणून पुन्हा त्या नागराजाने कडकडून दंश केला. तरी साधूवर काही परिणाम झाला नाही. साधू त्याला म्हणाला, ‘अरे तू निष्कारण दंश करून कित्येकांना ठार केलेस, जन्म माणसाचा असो की सर्पाचा. पाप पदरी पडतेच. तुझ्या खाती किती पाप जमा झाले असेल याचा कधी विचार केला आहेस का?’ ‘मग मी काय करू महाराज?’ ‘तू आजपासून दंश करायचे सोडून दे. उंबराची फळं भक्षण कर व देवाचे नामस्मरण करत त्याच उंबर वृक्षाखाली रहा. ही पायवाट मोकळी कर.’ साधूचे ऐकून नागराज उंबराच्या झाडाखाली गेला व पिकलेली सुंदर फळे खाऊन ‘हरी हरी’ मंत्रजप करीत राहिला. साधूने गावात जाऊन आजपासून नागराजाने पायवाट मोकळी केली व त्याने दंश करण्याचे सोडल्याचे सर्वांना सांगितले. मग गावकरी निर्धास्तपणे त्या पायवाटेवरून येऊ-जाऊ लागले. एके दिवशी एक गारुडी आला. त्याने उंबराच्या झाडाखाली उंबर फळाप्रमाणे लालबुंद अशा नागाला पाहिले व टोपलीत बंद करून घेऊन गेला. नागराज संन्यासी बनला होता. उंबर फळे खाऊन तो लाल झाला होता. त्या गारुड्याने तो लाल नागराज दाखवून शहरात त्याचे खेळ दाखवू लागला. तो मोठा लाल नाग पाहून लोक अचंबित होऊन पैसे, धान्य व फळे देऊ लागले. गारुडी खूष होता. तो संन्यासी साधू गर्दी पाहून तेथे आला. तेव्हा नागराज इतका मऊ झालेला पाहून साधूला वाईट वाटले. साधू त्या नागराजाजवळ आला व म्हणाला, ‘इतकाही मऊ होऊ नकोस की, तुझ्या आयुष्याचा अर्थच निघून जाईल. यापुढे तू मोठे फुत्कार टाक पण कुणाला चावू नकोस. नुसत्या फुत्काराने लोक तुका घाबरतील.’ त्याबरोबर नागराजाने मोठा फुत्कार टाकला. गारुडी व लोक घाबरले. मग तो नागराज सळसळत जंगलाकडे निघून गेला. ‘पाहिलंत, जगात अगदीच मऊ वागून चालत नाही. बरं का मुलांनो!’ आजोबा म्हणाले. दीपा व मनोज हसले