नगर अर्बन बँकेतील घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन दोन संचालकांना २ फेब्रुवारीपर्यंत ‘पोलीस कोठडी’

0
42

नगर अर्बन कर्ज घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेले नगर अर्बन बँकेचे तत्कालीन संचालक तथा माजी नगरसेवक मनेष साठे व अनिल कोठारी या दोघांनाही न्यायालयाने २ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून नगर अर्बन बँकेतील २८ संशयित कर्ज प्रकरणात फसवणूक व १५० कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आर्थिक गुन्हे शाखेमार्फत याचा तपास सुरू आहे. बँकेच्या सर्व कर्ज प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडिट झालेले आहे. या संदर्भातील अहवाल मागील महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. यात हा घोटाळ्याचा आकडा २९१ कोटीच्या वर गेल्याचे फॉरेन्सिक ऑडिटमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने शाखाधिकारी राजेंद्र शांतीलाल लुनिया व प्रदीप जगन्नाथ पाटील या दोघांना अटक केली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी या तपासाला गती देण्यासाठी ’एसआयटी’ नेमलेली आहे. या ’एसआयटी’ ने नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी पहिल्यांदाच तत्कालीन संचालकांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे. दोन माजी संचालकांना अटक झाल्यामुळे आता इतर संचालक परार झाले असल्याची माहिती समोर येत आहे. अनेकांचे फोन स्विच ऑफ झाले असून अटकेच्या भीतीने अनेक जण नगर शहर सोडून बाहेर गावी गेल्याची चर्चा सध्या सुरू आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील मंगेश दिवाणे यांनी काम पाहिलं तर आरोपींच्या वतीने अहमदनगर मधील अ‍ॅड महेश तवले, जामदार, संजय वालेकर, संकेत ठाणगे हे काम पाहत आहेत.