नगर व श्रीरामपूर परिसरात चेन स्नॅचिंग करणारे २ सराईत आरोपी जेरबंद; २२ तोळे सोने हस्तगत

0
78

नगर – नगर शहरासह श्रीराम पूर परिसरात चेन स्नॅचिंग करणारे २ सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहेत. त्यांच्या कडून चोरीचे सुमारे १५ लाख ७ हजार रुपये किंमतीचे २२.२ तोळे (२२२ ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. गणेश विठ्ठल आव्हाड (वय २४, रा. गजानन कॉलनी, नवनागापुर) व सागर रमेश नागपुरे (वय ३०, रा. सावतानगर, भिंगार) अशी या आरोपींची नावे आहेत. सावेडी उपनगरात एकविरा चौक येथे राहणारे प्रशांत शर्मा व त्यांच्या पत्नी १४ जानेवारी रोजी दुचाकीवरून जात असताना पाठीमागून मोटारसायकल वर आलेल्या २ अनोळखी इसमांनी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारत तोडून पळवून नेले होते. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. नगर जिल्ह्यात चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांना चेन स्नॅचिंगचे घटनांचा समांतर तपास करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पो.नि.आहेर यांनी पथकाची नियुेी करून तपास सुरु केला. घटनेच्या परिसरातील ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोघांवर संशय बळावला. त्यांचा शोध सुरु केल्यावर ते दोघे संशयित पल्सर मोटार सायकलवर भिस्तबाग परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली.

ही माहिती मिळताच पथकाने त्या परिसरात जावून सापळा लावला आणि गणेश आव्हाड व सागर नागपुरे यांना पकडण्यात आले. त्यांच्या कडे सोन्याचे दागिने व १ काळ्या रंगाची पल्सर मोटार सायकल मिळुन आली. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी नगर शहर, श्रीरामपूर व लोणी परिसरात चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली. या दोघांकडून एकूण १२ गुन्हे उघडकिस आले आहेत. या १२ गुन्ह्यातील सुमारे १५ लाख ७ हजार रुपये किंमतीचे २२.२ तोळे (२२२ ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक सोपान गोरे, पो.हे.कॉ.संदीप पवार, मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, देवेंद्र शेलार, विशाल गवांदे, पो.ना. संतोष खैरे, फुरकान शेख, पो.कॉ.शिवाजी ढाकणे, रणजित जाधव, आकाश काळे, अमृत आढाव व मेघराज कोल्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.