कार्यकारी अभियंत्याच्या घरातून रोख रक्कम व दागिन्यांची चोरी

0
50

नगर – पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचे बंद घर फोडून चोरट्यांनी रोकड व सोन्या – चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उपनगरातील गावडे मळा येथील स्वामी गजानन नगर येथे घडली आहे. याबाबत कार्यकारी अभियंता अजय आसराजी मुळे (वय ५२, रा.स्वामी गजानन नगर, गावडेमळा, अहमदनगर) यांनी रविवारी (दि.२१) दुपारी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. मुळे हे पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असून, त्यांची पालघर येथे बदली झाली आहे. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या हॉलच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेली १५ हजारांची रोकड, सोन्याची बाळी, चांदीची गणपतीची मुर्ती व सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा ऐवज चोरून नेला. रविवारी सुट्टी असल्याने ते नगरला आले असता त्यांना चोरीची घटना निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भा.दं. वि. कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.