नगर शहरामधील दाम्पत्याला कोल्हार घाटात भरदिवसा लुटले

0
19

दोन लाखांचे दागिने पळविले; अनोळखी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

नगर – नगरहून जेऊर – कोल्हार मार्गे पाथर्डीला नातेवाईकांना भेटण्यासाठी दुचाकीवर चाललेल्या पती- पत्नीला कोल्हार घाटात अडवून तीन अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सुमारे २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ओरबाडून बळजबरीने पळवून नेल्याची घटना रविवारी (दि.२१) दुपारी १ ते १.३० च्या सुमारास घडली. याबाबत सौ. संगीता सारंगधर वांढेकर (रा. विद्या कॉलनी, आदर्श नगर, कल्याण रोड यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी संगीता व त्यांचे पती सारंगधर वांढेकर हे रविवारी (दि.२१) दुपारी पाथर्डी तालुयातील जोडमोहोज येथे त्यांच्या आई वडिलांना भेटण्यासाठी दुचाकीवर जेऊर – कोल्हार मार्गे जात होते.

कोल्हार घाटात गेल्यावर पाठीमागून एका मोटारसायकलवर २ इसम आले व त्यांनी तुम्हीं आमच्या मोटारसायकलला कट का मारला असे म्हणत हुज्जत घालायला सुरुवात केली. फिर्यादी संगीता यांचे पती त्यांच्याशी चर्चा करत त्यांना समजून सांगत असताना त्या तिघांमधील एक जण संगीता यांच्या जवळ आला व त्याने त्यांच्या गळ्यातील मिनी गंठन व मोठा गंठन हिसका मारून तोडला आणि तो घेवून ते तिघे काही क्षणातच मोटारसायकल वर बसून कोल्हारच्या दिशेने भरधाव वेगात पसार झाले. या घटनेनंतर घाबरलेल्या वांढेकर दाम्पत्याने एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधला. नंतर पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात ३ चोरट्यांच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ३९२, ३४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.