रात्री घरात घुसून चाकूचा धाक दाखवून महिलेचे दागिने पळविले

0
50

नगर – रात्रीच्या वेळी एका चोरट्याने घराच्या किचनच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करत घरात झोपलेल्या महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील पावणे तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने बळजबरीने चोरून नेल्याची घटना तपोवन रस्त्यावरील साईनगरमध्ये घडली. याप्रकरणी संगीता बंडू चौधरी (वय ४७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या पतीला कंपनीत नाईट ड्यूटी असल्याने ते शुक्रवारी (दि. १९) रात्री पावणे बाराच्या सुमारास कंपनीत गेले होते. घरातील इतर लोक आपआपल्या रूममध्ये झोपलेले असताना शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास अज्ञात व्येीने किचनचा दरवाजा तोडून हॉलमध्ये प्रवेश केला. फिर्यादीला चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मिनी गंठण, सात ग्रॅमचे सोन्याचे झुंबर तसेच कानातील वेल जबरदस्तीने काढून घेतले.

त्यानंतर फिर्यादीने आरडाओरडा केला असता चोरटा किचनच्या दरवाजातून पळून गेला. घडलेला प्रकार फिर्यादीने पती व मुलांना सांगितला. फिर्यादीच्या गळ्यातील व कानातील दागिने जबरदस्तीने ओढल्यामुळे त्या जखमी झाल्या आहेत. या घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत चौधरी यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करीत आहेत.