मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
85

अफूचे व्यसन लागते का?

पापाव्हेर सॉम्नीफेरम या झाडाच्या फळातील रस वाळवल्यास अफू मिळते. हे झाड भारतात आढळून येते. अफू खाल्ल्याचे दुष्परिणाम हे त्यातील मॉर्फीन, कोडेन, थिबेन, पापाव्हरीन, तसेच नार्कोटीन या घटकांमुळे होतात. या झाडाच्या पिकलेल्या फळांमध्ये अफू असते. या फळाच्या बियांना ‘खसखस’ असे म्हणतात. आपल्या जेवणात आपण खसखस वापरतो. त्यात अफू नसल्याने काही दुष्परिणाम होत नाहीत. अफू खाल्ल्यास सुरुवातीला व्यक्तीला छान आनंदी असल्यासारखे वाटते. त्यानंतर डोकेदुखी, चक्कर येणे, पायांत गोळे येणे व झोप येणे; अशा गोष्टी आढळून येतात. ते जास्त प्रमाणात खाल्ल्यास व्यक्ती कोमात जाते व मरते. अफूमध्ये मॉर्फीन असते व ते वेदनाशमनाचे काम करते. त्यामुळे वेदना घालवणे, हे एक कारण व मानसिक स्तरावर समाधान मिळवणे (जे की ती व्यक्ती वास्तवात मिळवू शकत नाही) या दुसर्‍या कारणामुळे व्यक्तीला अफूचे व्यसन लागते. ही एक जीवनातील संघर्षातून, वास्तवापासून पळ काढण्याची वृत्तीच असते. व्यसनाने गंभीर स्वरूप धारण केल्यास व्यक्तीचा वास्तवाशी संपर्क राहत नाही. तिला अनेक भ्रम होतात. दुसर्‍याशी ती चांगले संबंध ठेवू शकत नाही. लैंगिक विकृतीही निर्माण होतात. अफूची विषबाधा झाल्यास नॅलोरफीन या विशिष्ट औषधाचा उपयोग करावा लागतो. सध्या नॅलझोन या जास्त प्रभावी औषधाचा वापर करतात. अफूच्या व्यसनापासून माणसाची सुटका होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, व्यसन सोडण्याची त्या वयक्तीची इच्छा पाहिजे. त्याचे मन खंबीर असेल, तरच तो अफू सोडू शकेल. काही काळासाठी त्याला घरापासून व मित्रमंडळापासून दूर ठेवावे लागेल. अफू दुसर्‍या कोणाकडून त्याला मिळणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागते. अफूचे सेवन थांबवल्यावर व्यक्तीला सुरुवातीला त्रास होतो; पण दोनय्चार दिवसांत त्यांचे गांभीर्य बरेचसे कमी होते. अफूवरून आठवले. खेड्यात स्त्रिया शेतावर काम करताना मुलांना अफूचे बोंड चोखायला देऊन झोपवून टाकतात. त्यामुळे मुले झोपाळू होतात व त्यांच्या बुद्धीची वाढही योग्य रीतीने होत नाही.