दोन वाहनातून नगरकडे आणला जाणारा गुटख्याचा साठा पकडला

0
42

नगर-सोलापूर महामार्गावर एलसीबीची कारवाई; २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

नगर – दोन वाहनातून वाहतूक केला जात असलेला सुमारे ९ लाख रूपये किंमतीचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रूईछत्तीशी (ता. नगर) शिवारात पकडला. गुटखा, वाहने, मोबाईल असा एकुण २८ लाख ७० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी सहा जणांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून दोघे पसार झाले आहेत. सदरची कारवाई बुधवारी (दि. १०) रात्री १० वाजेच्या सुमारास केली. महंमद सोहेल इक्रम निपाणीकर, नदीम गुलर पठाण (दोघे रा. निपाणी चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक), सईद ऊर्फ रियाज अर्शद दिवाण (वय ३७, रा. रविवार पेठ, कराड, जि. सातारा), इसरार अहमद सलाउद्दीन शेख (रा. इसकपूर ता. गलीगंज, जि. आझमगड, उत्तरप्रदेश), जुबेर सिकंदर डांगे (वय २८, रा. कराड, जि. सातारा), खाजीद ऊर्फ शाहरूख अर्षद दिवाण (वय ३७, रा. रविवार पेठ, कराड, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील महंमद सोहेल इक्रम निपाणीकर व नदीम गुलर पठाण पसार झाले आहेत. दोन वाहनांतून हिरा पानमसाला, रॉयल ११७ गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यांनी बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास रूईछत्तीशी शिवारात गुटखा वाहतुक करणारे संशयीत वाहने पकडली. त्याची झडती घेतली असता त्यात एकुण ९ लाख रूपये किमतीचा गुटखा मिळून आला. पोलिसांनी गुटखा, वाहने व चौघांचे मोबाईल असा २८ लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत जप्त केला आहे. तपास नगर तालुका पोलीस करीत आहेत.