भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नगरमधील पूर्णाकृती पुतळ्याचे २० जानेवारीला होणार भूमीपूजन

0
56

शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा यासाठी आंबेडकरी समाजाने २५ वर्ष न्यायालयीन प्रक्रिया लढत व आंदोलनाच्या माध्यमातून व पुतळा कृती समितीच्या वतीने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, मनपाच्या माध्यमातून मार्केट यार्ड प्रवेशद्वारा समोर (दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात नुकताच साकारण्यात आलेल्या पुतळ्याची प्रतिकृती) डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पूर्णाकृती पुतळ्याचे भूमीपूजन २० जानेवारी राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार होणार असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कृती समितीचे नेते अशोक गायकवाड, सुरेश बनसोडे, अजय साळवे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे, शहर अभियंता मनोज पारखे, जल अभियंता परिमल निकम, इंजि. श्रीकांत निंबाळकर, माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड, राहुल कांबळे, सुनील क्षेत्रे, विजय भांबळ, सुमेध गायकवाड, किरण दाभाडे, संजय जगताप, पोपट जाधव, कौशल गायकवाड, बंडू आव्हाड, अशोक खंडागळे, संजय कांबळे, सोमनाथ शिंदे आदी उपस्थित होते. आ. संग्राम जगताप म्हणाले की, शहरात उभारण्यात येत असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्याच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा वारसा तळागाळातील व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचे काम होणार आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधानाच्या माध्यमातून दिशा दिली आहे, त्यांचे विचार समाजासमोर यावे यासाठी त्यांचा नगर शहरात भव्यदिव्य पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. अरुण जगताप हे नगराध्यक्ष असताना शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक निर्माण केले. मागील काळात त्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र काही विघ्नसंतोषी लोकांच्या तक्रारीमुळे ते काम मार्गी लागले नाही. मात्र आता स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी शासनाच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला जाईल.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमीपूजन २० जानेवारीला होणार असून त्याची माहिती देताना आ. संग्राम जगताप आणि कृती समितीचे सदस्य

 

विधानभवनात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. त्याच धर्तीवर आपल्या नगर महापालिकेत भव्यदिव्य पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असल्यामुळे येथून जाणार्‍या प्रवाशांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपल्या शहराचा नावलौकिक होत आहे. लवकरच छत्रपती संभाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्यात येणार आहे. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचाही पूर्णाकृती पुतळा शहरात उभारण्यात येणार आहे. अशोक गायकवाड म्हणाले की, नगर शहरात महापुरुषांचे पुतळे उभे राहत असून ही आनंदाची बाब आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा अनेक वर्षांच्या लढ्यानंतर उभा राहत असून याचे सर्व श्रेय आ. संग्राम जगताप यांचेच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या पुतळ्यानंतर त्या पुतळ्याची प्रतिकृती नगर शहरात उभारण्यात येत आहे. या पुतळ्याच्या चबुतर्‍याची उंची १८ फूट असून पुतळा १० फुटाचा असून एकूण २८ फुटाचा भव्यदिव्य पुतळा असणार आहे. तसेच येत्या ६ महिन्यात या पुतळ्याचे काम पूर्ण होणार आहे. २० जानेवारी रोजी धार्मिक पूजा करत सायंकाळी ५ वाजता भूमिपूजन होणार आहे. पांजरपोळ मैदानावर गायक अजय देहाडे यांच्या भीम संगीताची मैफिल होणार आहे. तरी नगरवासियांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खा. डॉ. सुजय विखे, जिल्हाधिकारी, आयुक्त, पोलीस अधिक्षक, व जिल्ह्यातील आमदार उपस्थित राहणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सुरेश बनसोडे म्हणाले की, नगर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा अशी सर्वांची इच्छा होती ती आता पूर्ण होत आहे. त्यासाठी आ. संग्राम जगताप यांचे मोठे योगदान लाभले आहे. त्यांनी या कामासाठी पुढाकार घेतल्यामुळेच हे काम पूर्णत्वास जात आहे. या पूर्णाकृती पुतळ्याच्या माध्यमातून शहराच्या वैभवात भर पडेल व या माध्यमातून आजच्या युवा पिढीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अवगत होतील, असे ते म्हणाले.