नगरमधील व्यापाऱ्यांचे पैसे चोरणाऱ्या दोघांना अखेर पोलिसांनी पकडले

0
76

नगरमधील व्यापार्‍यांचे पैसे चोरणार्‍या दोघांना पकडून मुद्देमाल हस्तगत केल्यानंतर त्यांच्या समवेत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक.

 

नगर शहरातील व्यापार्‍यांच्या गल्ल्यातील रोख रक्कमा चोरणारे, बॅग लिफ्टिंग करणारे दोन सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहेत. दोन दिवसांपूर्वी दिल्लीगेट येथे कार्यालयातून झालेली ३ लाखांची चोरी, तसेच दिवाळीच्या काळात मंगलगेट येथील व्यापार्‍याच्या दुकानातून २ लाखांची चोरी व बाजारपेठेतून ५० हजारांची रोकड असलेली बॅग चोरी, असे तीन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून २ लाख १० हजारांची रोकड व गुन्ह्यात वापरलेली ५० हजारांची मोटारसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विठ्ठल संजय घोडके (वय २४) व सचिन सुभाष घोडके (वय ३३, दोघे रा. घोसपुरी, ता. नगर) अशी आरोपींची नावे आहेत. दिवाळीच्या काळात शहरातील बाजारपेठेत चोरीच्या घटना वाढल्या होत्या. आमदार संग्राम जगताप पोलिसांना धारेवर धरत उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. तसेच, दोन दिवसांपूर्वी दिल्लीगेट येथे चोरी झाली होती. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स.पो.नि. हेमंत थोरात, पो.हे.कॉ. सुनिल चव्हाण, संदीप पवार, देवेंद्र शेलार, पो. ना. रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से, पो.कॉ. अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व चालक पो.हे.कॉ. संभाजी कोतकर यांचे पथक नियुक्त केले होते. तपास सुरू असताना सादर गुन्हे विठ्ठल घोडके व सचिन घोडके यांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी नगर – दौंड रोडवर बाबुर्डी बेंद फाटा येथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी तिन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपी घोडके याच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत.