जाब विचारणार्या नागरिकांना अरेरावीची भाषा
नगर – शहरात कचरा गाड्यांच्या माध्यमातून दैनंदिन कचरा उचलला जातो. सदर कचरा हा साधारण सकाळच्या सत्रात उचलणे आवश्यक असताना बहुतांश गाडीचालक स. ११ ते दु. २ या वेळेत कचरा संकलन करतात. ऐन वर्दळीच्या वेळी रस्त्यावर गाड्या उभ्या करून कचरा उचलला जात असल्याने काही भागात वाहतूक ठप्प होऊन नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत गाडीचालकाला जाब विचारल्यास नागरिकांवर मुजोरगिरी करून गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असून, याबाबत महापालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदार संस्थेने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. शहरात ठिकठिकाणी संकलित झालेला कचरा गाड्यांमध्ये भरून तो बाहेर नेला जातो. त्यासाठी नेमलेल्या गाड्या ठरवून दिलेल्या रुटप्रमाणे दररोज कचरा उचलतात. परंतु बहुतेक गाडीचालक सकाळच्या सत्रात कचरा न उचलता दुपारी वर्दळीच्या वेळी रस्त्यांवर गाड्या उभ्या करून कचरा उचलतात.
गाडी रस्त्यावरच उभी केल्याने रहदारीला अडथळे निर्माण होतात. जुने जिल्हाधिकारी कार्यालय ते हातमपुरा रस्त्यावर युनियन अध्यापक विद्यालयासमोर दररोज रस्त्यावर गाडी उभी करून कचरा उचलण्यात येतो, परंतु गाडी रस्त्या वर उभी केली जात असल्याने वाहतूक पूर्ण ठप्प होते. गाडी बाजूला उभी करण्यासंदर्भात कोणी सांगितल्यास गाडीचालक त्याच नागरिकांना अरेरावी करत थेट शासकीय कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत मुजोरपणा करत आहे. वाहतूक ठप्प होत असल्याने नागरिक, वाहनचालक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी महापालिका प्रशासन आणि ठेकेदार संस्थेने याबाबत संबंधित गाडीचालकांना समज देऊन कचरा उचलण्याचे काम सकाळच्या सत्रात करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.