चारा वाहतुकीच्या ट्रक, ट्रॅक्टरमुळे मार्केटयार्ड परिसरात वाहतूक कोंडी

0
40

तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने ‘कडबा मार्केट’ नगर शहराबाहेर हलविण्याची मागणी

नगर – नगर बाजार समितीच्या कडबा मार्केटमध्ये येणार्‍या मालवाहतूक ट्रक, ट्रॅक्ट्ररमुळे आनंदधाम ते सारसनगर परिसरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांसह नागरिक त्रस्त झाले असून, या अवजड वाहतुकीचा नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. बाजार समितीच्या कडबा मार्केटमध्ये दररोज शेकडो ट्रक, ट्रॅक्ट्रर आणि इतर वाहने जनावरांचा चारा घेऊन येतात. तथापि या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त चारा भरलेला असतो. त्यामुळे रस्त्यावरून ही वाहने ये-जा करताना इतर वाहतुकीस अडथळे निर्माण होतात. ट्रॅक्ट्ररला तर दोन-दोन आणि तीन ट्रॉली जोडल्या जात असून, ट्रॅक्ट्रर चालकाला शेवटच्या ट्रॉलीचा अंदाज येत नसल्याने अनेकदा दुसरी अथवी तिसर्‍या ट्रॉलीला हेलकावे बसून शेजारून जाणार्‍या वाहनांना त्याचा ध क्का बसून अपघाताच्या घटना घडत आहेत. ट्रकमध्येही क्षमतेपेक्षा जास्त कडबा, ऊस आणि वाढे भरले जातात.

असे ट्रक रस्त्यावरून धोकादायक पद्धतीने चालविले जातात आनंदधाम, सारसनगर परिसरात दररोज पहाटे ५ ते ९ आणि संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत या चारा वाहतुकीच्या अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. नागरिकांचा जीव धोयात घालून ही वाहतूक केली जाते. दररोज सुमारे ५० ट्रॅक्ट्रर ऊस, वाढे घेऊन दोन-तीन ट्रॉली जोडून कडबा मार्केटमध्ये येतात. ट्रक, ट्रॅक्ट्रर बेदरकारपणे चालवून रस्त्यावरील इतरांना ही वाहने धोकादायक ठरत आहेत. सदर ट्रॅक्ट्रर, ट्रक हे सायंकाळी आनंदधाममार्गे सारसनगर भागात वजनकाटा करून कडबा मार्केटमध्ये रात्री लावले जातात. पहाटेपासून त्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होतात. या ऊस वाढ्याचे पाचरट सकाळी ११ वा. पयरत मार्केटमध्ये पसरलेले असते. त्यामुळे व्यापारी, दुकानदारही त्रस्त झाले आहेत. तरी याबाबत शहर वाहतूक पोलिस, परिवहन अधिकारी आणि बाजार समिती प्रशासनाने मार्ग काढावा. सदर कडबा मार्केट शहराबाहेर हलवावे, अशी मागणी होत आहे.

क्षमतेपेक्षा जास्त भराई ठरतेय धोकादायक

विशेष म्हणजे चारा वाहतूक करणार्‍या या ट्रक, ट्रॅक्ट्ररमध्ये क्षमतेपेक्षा जास्त चारा भरल्याने तो चारा पाठीमागच्या बाजूने रस्त्यावरून लोळत चालतो. त्यामुळे ट्रक, ट्रॅक्ट्ररचे रिफ्लेटर अथवा इंडिकेटर दिसून येत नाही. त्यामुळे रात्रीच्या अंधारात अनेकदा पाठीमागची वाहने ट्रक, ट्रॅक्ट्ररवर धडकून अपघाताच्या घटना घडतात. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्ट्ररचालक तर वाहतूक करताना मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर लावून चालतात. त्यामुळे पाठीमागून येणार्‍या वाहनचालकाने हॉर्न वाजवले तरी त्याला साईड दिली जात नाही. तसेच मागील ट्रॉलीला कोणी धडकला किंवा ट्रॉलीचा हेलकावा बसून एखादा वाहनचालक पडला, जखमी झाला तरी ट्रॅक्ट्रर चालकाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना न करता रस्त्यावरून चारा अथवा ऊस वाहतूक करणार्‍या अशा ट्रक, ट्रॅक्ट्ररवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.