महागड्या दुचाकींच्या चोऱ्या करणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले

0
43

५ लाख ५० हजारांच्या ६ दुचाक्या केल्या हस्तगत

नगर – महागड्या दुचाकी चोरून त्या शेतात, जंगलात किंवा डोंगर भागात लपवायच्या, काही कालांतराने त्या वाहनांचा सोक्षमोक्ष लावायचा अशी चोरीची पद्धत वापरणार्‍या दोघा मोटारसायकल चोरांना कोतवाली पोलिसांच्या पथकाने पकडले असून त्यांच्याकडून चोरलेल्या ५ लाख ५० हजार रुपये किमतीच्या ६ महागड्या दुचायाही हस्तगत केल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी, दि.७ डिसेंबर रोजी नगरच्या वैभव घोरपडे यांची पल्सर गाडी चोरीला गेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती. गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरील दुचाकी चोर हे सराईत असून ते विविध भागातून दुचाकी चोरतात.

ते सराईत नेवासा भागात सापडतील अशी माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक यादव यांनी लागलीच गुन्हे शोध पथक तयार करून नेवासा या ठिकाणी रवाना केले. या पथकाने तीन दिवस सूक्ष्म तपास करून त्या ठिकाणाहून अमित अशोक नगरे व धनाजी ज्ञानदेव कुचेकर (दोन्ही रा. नेवासा फाटा, ता. नेवासा) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना चोरी केलेल्या दुचाकीबाबत माहिती विचारली मात्र त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. खोटी माहिती देऊन पोलिसांचीच दिशाभूल केली. त्यांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी नगर शहरातून ३ संभाजीनगर येथून ३ अशा एकूण ६ मोटारसायकल चोरीची कबुली दिली. त्यामध्ये बजाज पल्सर एन.एस.१२५, आर- १५, पल्सर २२०, एच.एफ. डिलस २, डेस्टिनी १२५ अशा सहा दुचाकींचा समावेश आहे

अश्या ५ लाख ५० हजारांच्या ६ दुचाकी कोतवाली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या दुचाकी वैभव अनिल घोरपडे (रा.बांबू गल्ली, अहमदनगर), अदनान मन्सूर शेख (रा. झेंडीगेट, अहमदनगर), सचिन साहेबराव जोगदंडे (रा. छत्रपती संभाजी नगर), रामदास रांजणे (रा. छत्रपती संभाजीनगर), मिठू श्रीपाद वाल्लेकर (रा. इस्लामपूर) यांच्या असून एका वाहनाचे मालकाचा शोध घेणे सुरू आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे,योगेश भिंगारदिवे, शाहिद शेख, ए. पी. इनामदार, सलीम शेख, अतुल काजळे, अभय कदम, अमोल गाढे, संदीप थोरात, सुजय हिवाळे, सोमनाथ राऊत, वंदना काळे व मोबाईल सेलचे राहुल गुंडू आदींनी केली आहे.