कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका

0
21

नगर – कत्तलीसाठी काटवनात बांधून ठेवलेल्या सहा जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी दोघांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते पसार झाले आहेत. पोलिसांनी काटवनातून ४५ हजार रूपये किमतीचे सहा जनावरे ताब्यात घेतले आहेत.

तन्वीर मोहंमद कुरेशी, आसिफ इबाल कुरेशी (दोघे रा. भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत पोस्ट ऑफिससमोर बाभळीच्या काटवनात गोवंशीय जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यांनी मंगळवारी (दि. ९) रात्री ११ वाजता नमूद ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे सहा गोवंशीय जनावरे बांधून ठेवलेली आढळून आली. पोलिसांनी त्या सहा जनावरांची सुटका केली आहे.