सभापती राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेस नगरमध्ये ‘जोडे’ मारुन निषेध आंदोलन

0
31

नगर – शिवसेना (ठाकरे गट) च्यावतीने नेता सुभाष चौक येथे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वे कर यांनी जो निकाल दिला, त्याचा जाहीर निषेध व्ये करुन त्यांच्या प्रतिमेस जोडे मारुन आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, भगवान फुलसौंदर, संजय शेंडगे, उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव, अनिल बोरुडे, बाळासाहेब बोराटे, दत्त जाधव, सचिन शिंदे, शाम नळकांडे, संग्राम कोतकर, संतोष गेनप्पा, स्मिता अष्टेकर, विजय पठारे, सुरेश तिवारी, अशोक दहिफळे, अंबादास शिंदे, गौरव ढोणे, अरुण झेंडे, जालिंदर वाघ, संदिप दातरंगे, पप्पू भाले, महेश शेळके, दिपक भोसले, श्रीकांत चेमटे, मुन्ना भिंगारदिवे, कैलास शिंदे आदिंसह शिवसेना, युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना कोणाची व अपात्रतेबाबत जो निर्णय दिला, तो संपूर्णपणे भाजपाच्या इशार्‍यावर दिला आहे. राज्याने पाहिले आहे की, ज्या ४० आमदारांनी उद्धव ठाकरे गटाशी गद्दारी केली ती सर्व जनतेला माहिती आहे. शिवसेना ही कोणाची आहे सर्वश्रुत आहे.

सभापती नार्वेकर यांनी दिलेला निकाल पुर्णपणे भाजपाची स्क़्रीप्ट आहे. त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवणे हे चुकीचे आहे. हा निकाल मॅनेज असून, हा निकाल विरोधात गेला असला तरी या विरोधात आम्ही सुप्रिम कोर्टात जावू आणि शेवटी सर्वात मोठे जनतेचे न्यायालय आहे, जनताच ठरवेल की खरे शिवसैनिक कोण आहेत. सभापतींनी दिलेल्या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे सांगितले. याप्रसंगी भगवान फुलसौंदर म्हणाले, आजचे सत्तेतील सरकार हे हुकूमशाही सरकार आहे. सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करुन प्रत्येक गोष्ट आपल्या बाजूने करुन घेत आहेत. शिवसेना ही खर्‍या अर्थाने ठाकरेंची आहे, हे जनतेनेलाही मान्य आहे. परंतु सत्तेसाठी लाचार झालेल्या भाजपाने सर्व नियम पायदळी तुडवत हा निकाल दिला आहे. परंतु घोडामैदान जवळच आहे, येणार्‍या निवडणुकीत जनताच त्यांना धडा शिकवेल, असे सांगितले. यावेळी विक्रम राठोड यांनीही हा निकाल नियोजित असून, निकालापुर्वीच सभापतींशी चर्चा करुन निकाल काय लागणार हे आधीच निश्चित झाले होते, त्यामुळे असा निकाल त्यांच्याच बाजूने अपेक्षीत होता. या निकालाचा आम्ही निषेध करतो. या निकालातून ५० खोके एकदम ओके, असेच म्हणावे लागेल. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करुन त्यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले.