आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक १२ जानेवारीपासून पुन्हा संपावर

0
27

महापालिकेतील आरोग्य अधिकारी यांना संपाची नोटीस; आश्वासन देऊन देखील शासन निर्णय काढला नसल्याचा संताप

नगर – आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना संपा दरम्यान मान्य केलेल्या मोबदला वाढीचा शासन निर्णय दीड महिना उलटून देखील निघत नसल्याने ऑनलाइन कामावर बहिष्काराचा निर्णय घेऊन १२ जानेवारीपासून पुन्हा बेमुदत संपावर जात असल्याचा इशारा महापालिकेतील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी दिला आहे. महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने पुन्हा संपाची हाक देण्यात आली असून, या पार्श्वभूमीवर महापालिकेतील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या शिष्टमंडळाने मनपाचे आरोग्य  अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना संपाची नोटीस दिली. यावेळी आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉ. अ‍ॅड. सुधीर टोकेकर, स्वाती भणगे, सुरेखा भुजबळ, शबाना पठाण, अनिता डहाळे, अश्विनी लोंढे, अफसाना शेख, अनिता तिवारी, प्रतीक्षा ठाणगे, दिपाली नेमाने, विद्या फुलसौंदर, वर्षा भिंगारदिवे, विद्या लांडगे, अश्विनी मंडलिक, सुनिता पाठक, अश्विनी गायकवाड, सोनाली मगर, नंदा बारस्कर, कविता लाहोर, अर्चना परब, हसीना शेख, दुर्गा चंद्रे आदींसह आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. राष्ट्रीय आरोग्य अभियानात राज्यात सुमारे ७० हजार आशा स्वयंसेविका व साडेतीन हजारापेक्षा अधिक गटप्रवर्तक कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी १८ ऑटोबर ते ९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत राज्यव्यापी संप पुकारला होता. या संपाच्या पार्श्वभूमीवर संप काळात आरोग्य मंत्री यांनी १ नोव्हेंबर रोजी संपाच्या वाटाघाटी साठी कृती समिती सोबत बैठक घेऊन आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना दिवाळी भेट २ हजार दिवाळीपूर्वी देण्यात येणार व आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात ७ हजाराची वाढ व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात सहा हजार दोनशेची वाढ करण्याची घोषणा केली होती. गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात समाधानकारक वाढ न केल्यामुळे संप पुढे लांबला.

गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात समाधानकारक वाढ व्हावी, यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात समाधानकारक वाढ करण्यासाठी शिफारस केली. ९ नोव्हेंबर रोजी उपमुख्य सचिवांसोबत बैठक होऊन मुख्यमंत्र्यांनी यांनी अप्पर मुख्य सचिव यांना फोन करून गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात सहा हजार दोनशे वरून दहा हजार रुपयाची वाढ करण्याचे आदेशित केले. त्यानंतर कृती समितीने संप स्थगीत केला. तसेच संप काळातील कामकाज पूर्ण केल्यास त्याचा मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते.आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी संप काळातील कामे पूर्ण केली, परंतु त्यांचा मोबदला कपात करण्यात आला आहे. केलेल्या घोषणाचा अध्यापि शासन निर्णय काढण्यात आलेला नाही. तर कपात केलेला मोबदला आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना अदा करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. संप स्थगित होऊन दीड महिना होऊन गेला, परंतु शासन निर्णय निर्गमित होण्यासाठी कृती समितीच्या वतीने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर १८ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात आला. परंतु त्याची देखील दखल घेण्यात आलेली नाही. आश्वासन देऊन देखील शासन निर्णय निघत नसल्याने सरकारप्रती आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांमध्ये तीव्र नाराजगी पसरली आहे. आशा स्वयंसेविकांनी २९ डिसेंबर पासून सर्व ऑनलाईनच्या कामकाजावर बहिष्कार टाकलेले आहे. तर शुक्रवार पासून संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदला वाढीचे पत्र शेवटी सापडलेच नाही!

संपाच्या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना निवेदन दिले. मात्र डॉ. बोरगे यांनी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना मोबदला वाढीचे पत्र आले असून, त्यावर स्वाक्षरी झाले असल्याचा दावा केला. ते पत्र आलेल्या शिष्टमंडळास दाखवण्यासाठी कर्मचार्‍यांकडून कार्यालयात शोधाशोध करण्यात आली. शेवटी पत्र मिळत नसल्याने डॉ. बोरगे यांनी निवेदन स्विकारले.