मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
39

सिंह आणि कोल्हा 

एका रानात एक सिंह राहत होता; पण बरेच प्रयत्न करूनही त्याला शिकार मिळत नव्हती. भुकेने कासावीस झाला असता त्याने मनात काही विचार केला. त्याने रानात आपण फार आजारी आहोत अशी बातमी पसरेल, अशी व्यवस्था केली. थोड्याच दिवसांनी सिंह महाराज आजारी असल्याचे सर्व प्राण्यांच्या कानावर गेले. महाराजांच्या समाचाराला गेले पाहिजे; नाहीतर त्यांची आपणावर खप्पा मर्जी होऊन त्यांच्या रोषाला बळी पडावे लागेल, असा विचार करून रानातले अनेक प्राणी सिंह महाराजांच्या गुहेत गेले. अशा प्रकारे अनेक दिवस रानातले अनेक प्राणी महाराजांच्या समाचारासाठी गुहेत जात होते. रानातले सर्व प्राणी आले; पण अजून कोल्होबा कसे आले नाहीत, असा विचार सिंह महाराजांच्या मनात येताच एके दिवशी याची चौकशी करण्यासाठी त्यांनी लांडगेदादाला कोल्ह्याकडे पाठविले. तेव्हा लांडगेदादा चौकशी करण्यासाठी कोल्होबाकडे आला आणि म्हणाला, “अरे कोल्होबा, आपले सिंह महाराज फारच आजारी आहेत. रानातले सर्व प्राणी त्यांच्या समाचारासाठी आले. मग तुम्ही का बरे आला नाहीत? याची चौकशी करण्यासाठी महाराजांनी मला तुमच्याकडे पाठविले आहे. मग बोला, कधी येता समाचाराला?” त्यावर कोल्होबा म्हणाले, “अरे लांडगेदादा, सिंह महाराजांना माझा नमस्कार आणि शुभेच्छा सांगा. त्याचबरोबर त्यांना माझी एक विनंतीही कळवा की, “महाराजांवर माझे पूर्वीइतकेच प्रेम आणि निष्ठा आहे. त्यात कसलाही बदल झाला नाही. त्यांच्यावर माझे पूर्वीइतकेच प्रेम आहे आणि पुढेही राहील. महाराज आजारी पडल्याची खबर मलाही कळली. त्यांची विचारपूस करण्यासाठी जावे, असे मलाही मनापासून वाटते. पण माझ्या मनात काही कुशंका येतात. त्यांची गुहा नजरेस पडताच माझ्या अंगाचा थरकाप उडतो. आजपर्यंत रानातले जे जे प्राणी महाराजांच्या समाचाराला गुहेत गेले, ते अजूनपर्यंत तरी बाहेर आलेले दिसले नाहीत. असे असता मला गुहेत जाऊन महाराजांची विचारपूस करण्याचे धाडस होत नाही. असे आपण महाराजांना कळवा, म्हणजे झाले.” तात्पर्य ः कोणी एखादा लबाड माणूस आपले मतलब साधण्यासाठी काही तरी खोटी-नाटी अफवा पसरवतो. या त्याच्या भूलथापांना बळी पडणे, हे मूर्खपणाचे लक्षण होय.