बंद रस्ता खुला करण्यासाठी माजी सैनिकांनी घातले समाजसेवक अण्णा हजारे यांना साकडे

0
41

 

नगर- शहराजवळील हरीमळा येथे लष्करी हद्दीतील बंद करण्यात आलेला नगरवाला रस्ता खुला करण्यासाठी मागील सहा दिवसांपासून माजी सैनिक आणि त्यांचे कुटूंबिय आमरण उपोषणास बसलेले आहे. तथापी उपोषणकत्यारच्या मागणीकडे दुर्लक्ष करत लष्करीं अधिकार्‍यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर सैनिक महासंघाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेवून त्यांना या प्रश्नात लक्ष घालण्याचे साकडे घातले आहे. दरम्यान उपोषणकर्त्या काही आंदोलकांची प्रकृती खालावली असून अनेकांच्या शरीराला सुज आली असून, काहींना मोठा थकवा आल्याची माहिती सैनिक महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी दिली आहे. लष्करी हद्दीतील नगरवाला रस्ता वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशान्वये बंद करण्यात आल्याने दरेवाडी, हरीमळा, वाकोडी परिसरासह स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सदर रस्ता खुला करण्यासाठी शनिवार (दि.१६) पासून सैनिक महासंघ तसेच प्रहार सैनिक संघाच्या पदाधिकार्‍यांसह आजी-माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबिय स्टेशन हेड१ॉर्टरच्या समोर उपोषणास बसले आहेत.उपोषणात सैनिक महासंघाचे राष्ट ्रीय अध्यक्ष अ‍ॅड. संजय शिरसाठ, विनोदसिंग परदेशी, बॉबीसिंग बाजवा, संजय निमसे, अशोक चौधरी, वसंत दहातोंडे, राहुल ताकपिरे, बनकर सर, पुष्पाताई मुंढे, मंदाबाई ठोंबरे, प्रियांका तापकीर, मोहिनी ननवरे, मंगल निमसे, कमल अन्सारी यांच्यासह आजी-माजी सैनिकांचे कुटुंबिय, शाळकरी मुले, स्थानिक रहिवासी सहभागी झाले आहेत. तथापी या आदोलनाची लष्करी अधिकार्‍यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही.

आंदोलकांना साधे चर्चेसाठीही बोलावले नसून, त्यांची मागणीही समजून घेतलेली नाही. त्यामुळे सैनिक महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी गुरुवारी (दि.२१) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगण सिध्दी येथे भेट घेऊन चर्चा केली. या प्रश्नात लक्ष घालण्याबाबत त्यांना प़त्र दिले. सदर पत्रात म्हटले आहे की, अहमदनगर छावणीच्या हद्दीमध्ये सोलापूर रोड, जेके रोड ते पाथर्डी रोड, भिंगार हा रस्ता ‘नगरवाला रोड’ या नावाने ओळखला जातो. हा रस्ता काही लष्करी अधिकार्‍यांनी मनमानी पध्दतीने बंद केला आहे. रक्षा मंत्रालयाने दिलेल्या कोणत्याही तत्त्वाचे पालन न करता सदर रस्ता बंद करण्यात आला आहे. स्थानिक हद्दीतील जे सैनिक देशसेवेसाठी सीमेवर आहेत त्यांच्या परिवारांना रस्ता बंद झाल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी स्थानिक माजी सैनिकांनी वारंवार स्टेशन हेड१ार्टरला चकरा मारल्या आहेत. मात्र रस्ता अद्यापही खुला न केल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तरी आपण आपल्या पातळीवर सेना अध्यक्षांशी चर्चा करून बंद केलेला रस्ता कायमस्वरूपी खुला करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी आत्माराम दहातोंडे, हरीभाऊ शिर्के, सुखदेव दहातोंडे, डी. वाय. कुलकर्णी, संजय निमसे, दिनेश जाधव आदी उपस्थित होते.

लष्कराने नगर परिसरातील बंद केलेले सर्व रस्ते खुले करावे – विनोदसिंग परदेशी

शहराजवळील भिंगार, दरेवाडी, नटराज हॉटेल, पाथर्डी अशी अनेक ठिकाणी लष्कराने नगर परिसरातील बंद केलेले सर्व रस्ते खुले करावे, अशी मागणी प्रहार सैनिक कल्याण संघाचे अध्यक्ष विनोदसिंग परदेशी यांनी केली आहे. उपोषणाने त्याची प्रकृती बिघडल्याने त्यांना २ दिवस हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करावे लागले, ते गुरुवारी पुन्हा उपोषणात सहभागी झाले आहेत. परदेशी म्हणाले, आम्ही पण देशप्रेमी आहोत, कायदा मानतो सैन्यात होतो, पण रस्ता का बंद केला? संरक्षणाच्या नावाखाली बंद केला गेला तर रहिवाश्यांचे ओळखपत्र पाहून परवानगी द्यावी तसेच रस्ता का बंद केला, कोणाच्या परवानगीने बंद केला, शासनाचा आदेश आहे का, कोर्ट ऑर्डर आहे का, कि संरक्षण मंत्रालयाने परवानगी दिली याचा बोर्ड प्रत्येक ठिकाणी लावावा. कोणी अधिकारी येतो व रस्ता बंद करतो हे चुकीचे आहे राष्ट ्रीय अध्यक्ष अ‍ॅड. संजय शिरसाठ म्हणाले, आज आपला राष्ट ्रध्वज तिरंगा घेऊन उपोषणकर्ते बसले असून माजी सैनिकांना रस्त्यासाठी उपोषण करावे लागते हे दुर्दैवी आहे. ६ दिवसात आमच्या उपोषणाची दखल स्थानिक लष्करी प्रशासन, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी घेत नाहीत तर आम्हाला आंदोलन तीव्र करावे लागेल. आज येथील लोकांवर ही वेळ आली आहे, उद्या दुसर्‍यांवर येईल त्यासाठी राज्यातील सर्व माजी सैनिकांनी आंदोलनाला पाठींबा देऊन सहभागी व्हावे. येथील स्थानिक रहिवाशांनी या जमीनी लष्कराला दिल्या आहेत त्यांनाच जा-ये साठी बंदी केली आहे. जर हा रस्ता खुला झाला नाही तर राज्यभर आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.