बढाई अंगाशी आली

0
164

एका गावातील एक माणूस बरीच वर्षे प्रवासाला गेला होता. अनेक ठिकाणी प्रवास करून तो आपल्या गावी परतला. आपण प्रवासात किती गमती-जमती, किती मौज-मजा पाहिल्या, ते तिखट-मीठ लावून तो आपल्या शेजारी लोकांना, भेटे त्याला सांगू लागला. एकदा तर त्याने एक लोणकढी थाप ठोकून दिली. म्हणाला, ‘‘मी करणावतीला गेलो असता तेथील माणसे चांगली पंधरा-सोळा हात उंच उड्या मारीत असलेली पाहून मला मोठे नवल वाटले. मग त्यांनी अशी उंच उडी मारण्याची पैज माझ्याशीच लावली. तेव्हा मी इतकी उंच उडी मारली की, त्यांच्यापैकी कोणालाही माझी बरोबरी करता आली नाही.’’ ऐकणारी माणसे मनात म्हणत, काय थापाड्या आहे! उघडपणे कोणीही त्याचे म्हणणे मान्य करीत नसे; म्हणून तो वेगवेगळ्या शपथा घेऊन लोकांची खात्री पटवायचा प्रयत्न करीत असे. एकदा असाच तो अशी थाप जमलेल्या लोकांसमोर मारू लागला असता घोळक्यातील एक माणूस उठला आणि म्हणाला, ‘‘अरे, अशा शपथा कशाला घेतोस? त्यापेक्षा तशीच उडी येथे मारून दाखव ना!’’ हे ऐकताच तो बढाईखोर माणूस गप्प बसला आणि त्याने तेथून काढता पाय घेतला.

तात्पर्य – आपण पाहिलेल्या काही घटना फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते; पण कधी-कधी त्यांची फजितीही होते.