घसरणीची हॅटट्रिक; पुढे काय?

0
434

गतसप्ताहात सेन्सेक्समध्ये ०.६० टक्के म्हणजेच ३९८.६ अंकांची घसरण झाली आणि ६५,३२२.६५ वर हा निर्देशांक बंद झाला; तर निफ्टीमध्ये ०.४५ टक्के म्हणजेच ८८.७ अंकांची घसरण होऊन हा निर्देशांक १९,४२८.३० वर बंद झाला. बँक निफ्टी आणि रियल्टी इंडेक्समध्ये १.५ टक्क्यांची, तर निफ्टी एफएमसीजीमध्ये १ टक्क्यांची घसरण गतसप्ताहात दिसून आली. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून गतसप्ताहात ४७०२.०६ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री करण्यात आली; तर डीआयआयकडून २२५.३ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी करण्यात आली. टेक्निकल चार्टनुसार पाहिल्यास गतसप्ताहात २० डे एसएमएच्या नजीक आल्यानंतर बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला आहे. सध्याचा निफ्टीचा चार्ट पॅटर्न चालू पातळीवरुन आणखी घसरणीचे संकेत देणारा आहे.

शिशिर ऋतूतील पानगळीप्रमाणे भारतीय शेअर बाजारात एप्रिल ते जुलै या काळात भारतीय शेअर बाजारात फुललेला वसंत ऋतूतील बहर गेल्या तीन आठवड्यांपासून ओसरताना दिसू लागला आहे. ११ ऑगस्ट रोजी संपलेल्या सलग तिसर्‍या आठवड्यामध्ये भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी लाल निशाण फडकावत विसावा घेतला. या पडझडीस तीन प्रमुख कारणे होती. पहिले म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यंदाचे द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना रेपो दरांमध्ये कोणताही बदल केलेला नसला तरी चालू वर्षाखेरीपर्यंत रेपो दर कपात होणार नाही असे निःक्षून सांगितले. याखेरीज आयसीआरआर म्हणजे इन्क्रिमेंटल कॅश रिझर्व्ह रेशो कायम ठेवण्याचा निर्णय आरबीआयाने जाहीर केला. यामुळे बँकांना आरबीआयकडे कोणत्याही व्याजाविना अतिरिक्त रक्कम ठेवावी लागणार आहे. तसेच चालू आर्थिक वर्षात किरकोळ चलनवाढीचा दर ५.४ टक्के असू शकतो असे अनुमान आरबीआयने वर्तवले आहे. या तिन्हीही बातम्यांचा नकारात्मक परिणाम बाजारावर विशेषतः बँकिंग क्षेत्रातील समभागांवर दिसून आला. दुसरे कारण म्हणजे अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या अधिकार्‍यांनी वाढत्या महागाईमुळे आगामी काळात व्याजदरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तिसरे कारण अधिक महत्त्वाचे असून ते जगाची चिंता वाढवणारे आहे. जगाची उत्पादन फॅक्टरी असणार्‍या आणि जागतिक अर्थव्यवस्थेत दुसर्‍या स्थानी विराजमान असणार्‍या चीनमध्ये सध्या प्रचंड मंदीचे वारे वाहू लागले असून तेथील मागणीत कमालीची घट झाली आहे. विशेषतः तेथील बांधकाम क्षेत्रात पुन्हा एकदा मोठी पडझड होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या तिन्ही घटनांचा अत्यंत प्रतिकूल परिणाम भारतीय शेअर बाजारावर झालेला दिसून लागला.

नफ्टी १९५३०-१९५६० च्या पातळीखाली आहे तोवर १९३०० ते १९२५० पर्यंत आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे १९५६० च्या पातळीच्या वर गेल्यास १९६७० आणि १९७०० ची पातळी पहायला मिळू शकते. बँक निफ्टीचा विचार करता ४४ हजारांची पातळी महत्त्वाची आहे. ती तोडल्यास ४३६०० पर्यंत हा निर्देशांक घसरू शकतो. कंपन्यांच्या तिमाही निकालांचा हंगाम संपला असल्याने जागतिक आणि स्थानिक संकेतांनुसार बाजाराची वाटचाल राहणार आहे. जागतिक संकेतांमध्ये सकारात्मकतेच्या शक्यता कमी असल्याने सद्यस्थितीत बाजारात सेल ऑन राईज ही रणनीती प्रभावी ठरेल. तथापि, निफ्टी १९२०० ते १९१०० च्या पातळीपर्यंत खाली आल्यास तेथे गुंतवणुकीची संधी साधता येईल. जून महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक ३.७ टक्क्यांवर मर्यादित राहिल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. हा तीन महिन्यातील नीचांक आहे. चालू आठवड्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या समभागावर लक्ष ठेवून राहावे. ३४ रुपयांचा स्टॉपलॉस ठेवून ४२ ते ४५ रुपयांच्या मध्यमकालीन लक्ष्यासाठी खरेदी करता येईल. सीईइंडियाचा समभाग ४८५ रुपयांना खरेदी करुन ५२५ ते ५४० रुपयांचे लक्ष्य ठेवता येईल. नॉसिलचा समभाग २३० रुपयांना खरेदी करुन २६० ते २७३ रुपयांचे लक्ष्य ठेवता येईल. एचसीएल टेकचा समभाग ११६५ रुपयांना खरेदी करुन १२८० रुपयांचे लक्ष्य ठेवता येईल. याचा स्टॉपलॉस ११०० रुपये असेल. टाटा पॉवरचा समभाग २३५ रुपयांना खरेदी करुन २६५ रुपये लक्ष्य ठेवता येईल. विप्रोचा समभाग ४१३ रुपयांना खरेदी करुन ४३० रुपये लक्ष्य ठेवता येईल. रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग २५२० रुपयांच्या आसपास खरेदी करुन २६२० रुपये लक्ष्य ठेवता येईल. बीईएलचा समभाग१३२ रुपयांना खरेदी करुन १३८ रुपये लक्ष्य ठेवता येईल. इंडस टॉवरचा समभाग १७२ रुपयांना खरेदी करुन १८३ रुपये लक्ष्य ठेवता येईल. बँक ऑफ इंडियाचा समभाग ८७ रुपयांना खरेदी करुन ९४ रुपये लक्ष्य ठेवता येईल. बाजारात सलग तीन आठवडे पडझड झाल्यामुळे कदाचित एखादी तेजीची उसळी दिसू शकते; परंतु ती टिकण्याच्या शक्यता कमी आहेत. त्यामुळे सावध राहून ट्रेडिंग आणि गुंतवणूक करणे उचित ठरेल.