विमाधारक आहात?

0
262

दावा निकाली काढण्याच्या प्रक्रियेत विमाधारक हा काही किचकट शब्दांच्या जाळ्यात अडकतो. या शब्दांचा अर्थ त्याने पॉलिसी खरेदी करताना जाणून घेतलेला नसतो तर काहीवेळा विमा प्रतिनिधीकडून टाळाटाळ केली जाते. अशावेळी दावा वेळेत निकाली काढण्याची शक्यता कमीच राहते. या समस्येपासून बचाव करण्यासाठी विमाधारकांनी पॉलिसी सक्रिय करताना सजगता बाळगत बारीकसारीक मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे. कोणताही द्विअर्थ किंवा ज्या शब्दांचा अर्थ आपल्याला समजत नाही, अशावेळी विमा कंपनी प्रतिनिधींकडून माहिती घ्यायला हवी.

भारतीय विमा व्यवसायात ग्राहकांना किंवा विमाधारकांकडून करण्यात येणार्‍या पाच प्रमुख तक्रारीचे आकलन करू आणि त्याचे समाधान कसे केले जाते, ते पाहू. दावा निकाली काढण्यास विलंब: विमा उद्योगांकडे सर्वाधिक तक्रारी विमा दाव्यावरून असतात. विमा दावा निकाली काढताना कागदपत्रांचा अभाव राहिला तर त्यास विलंब होतो.दाव्याला उशीर होत असल्याची तक्रार ग्राहकांकडून केली जाते. काही कंपन्यांचा दावा निकाली काढण्याची प्रक्रिया किचकट असते आणि त्यामुळे दावा मिळण्यास अडचण येते. विम्याचा दावा निकाली काढताना अडचणी येऊ नयेत यासाठी सर्वप्रथम कंपनीकडून एका कागदावर अत्यावश्यक कागदपत्रांची यादी घ्यायला हवी. विमा कंपनीने ज्या कागदपत्रांची मागणी केली आहे, ते नियोजबद्ध पद्धतीने तयार करायला हवीत. दाव्यासाठी दाखल केल्या जाणार्‍या कागदपत्रांत मूळ पॉलिसी, स्वत: पॉलिसीधारक किंवा वारसदार, वारसाचे पत्र, पॉलिसी संबंधित विवरण, दावा निकाली काढण्यासाठी लागणारा अर्ज, आरोग्य तपासणी अहवाल, अन्य संबंधित अहवाल आणि विम्याचे बिल बाळगावे लागते. यानुसार कागदपत्रांची जुळवाजुळव केली तर वेळेची बचत होते. तसेच निरर्थक रिमाइंडरही येणार नाहीत. याप्रमाणे दावा निकाली काढण्याच्या प्रक्रियेत सुलभता येईल. दावेदारांना विमा कंपनीकडे निश्‍चित काळात कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे. कागदपत्रांना उशीर होत असेल तर आपण वेळेत दावा निकाली काढण्याची अपेक्षा करू शकत नाहीत.

पुरेसा विमा कवच न मिळणे – कधी कधी विमाधारकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी दाखल केलेली दाव्याची रक्कम ही जोखीम कवचच्या रकमेपेक्षा अधिक असते. अशावेळी विमा कंपनीकडून क्लेम मिळण्यास विलंब होतो. असा अनुभव येण्यामागचे कारण म्हणजे एखाद्या व्यक्तीने पुरेशी माहिती न घेता घाईगडबडीत खरेदी केलेली विमा पॉलिसी होय. पॉलिसी घेताना अचूक माहिती घेतलेली नसेल तर अडचणी येतात. या गोष्टी टाळण्यासाठी विचारपूर्वक पॉलिसीची आणि कवचची निवड करायला हवी. आर्थिक गरज ओळखून, मित्र, नातेवाईक, विमा योजनांची संपूर्ण माहिती गोळा करूनच विमा कवच घ्यायला हवे. जेणेकरून गरजेनुसार विम्याचा योग्य लाभ मिळेल. विमा नियम अमान्य: विमा व्यवसायातील तक्रारीत विमा नियम हा महत्त्वाचा घटक आहे. त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पॉलिसीधारक हे काही विमा कंपन्यांच्या नियमांशी सहमत राहू शकतात तर काही जण आक्षेप घेऊ शकतात. ग्राहक सेवा चांगली नसणे: विमा कंपन्यांकडून ग्राहकांची सेवा करण्याची परंपरा ही चांगलीच राहिलेली आहे आणि विम्याच्या नियमांत स्पष्टता असल्याने ग्राहकांना देखील सेवेचा योग्य लाभ मिळतो. मात्र प्रत्येक ठिकाणी चांगलीच सेवा मिळतेच असे नाही. या समस्येपासून वाचण्यासाठी ग्राहकांनी तक्रार निवारण अधिकार्‍यांशी झालेली चर्चा, तक्रार नंबर याबाबतची नोंद ठेवायला हवी. तक्रारीचे निवारण होत नसेल तर वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रार करायला हवी. टोल फ्री क्रमांक, विमा कार्यालय, सोशल मीडिया आदी माध्यमातूनही तक्रारीचे स्टेट्स जाणून घेऊ शकतो किंवा नव्याने तक्रार नोंदवू शकतो.

अचूक माहिती द्या- विमा व्यवसाय हा नेहमीच विश्‍वासाचा व्यवसाय समजला जातो. विमा धारकांनी आपल्या सवयी, आर्थिक स्थिती, आरोग्यासंबंधीचा इतिहास आदी माहिती प्रपोजल फॉर्मवर स्पष्टपणे भरायला हवी. काही माहिती भरण्यास मुद्दामहून टाळाटाळ केल्यास कंपनीचा विश्‍वास राहत नाही. तसेच विमा कंपनीने देखील विमा पॉलिसीचे लाभ, मर्यादा याची माहिती ग्राहकांना देणे बंधनकारक आहे. पॉलिसी खरेदी करताना ग्राहकांनी सर्व बाजूंनी विचार करूनच त्याची खरेदी करायला हवी.