आरोग्य सखी स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र आरोग्यपूर्ण म्हातारपण

0
103

थोडं काम, योगाभ्यास, सकाळ-संध्याकाळ मोकळ्या हवेत चालायला जाणे, संतुलित सकस आहार, बरोबरीच्या मित्रमैत्रिणींशी सुसंवाद व शांत झोप या सगळ्यांची सांगड घालता आली, तर नक्कीच वृद्धावस्थेत आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. वृद्धावस्थेमध्ये शारीरिक हालचाल कमी झालेली असते. बैठ्या स्वरूपातील काम जास्त असते. मासिक पाळी बंद झाल्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. म्हणून कमी उष्मांक असलेले पदार्थ आहारात असावेत. तारुण्यावस्थेमध्ये खाल्लेले पदार्थ या वयात जास्त प्रमाणात खाऊ नयेत. वनस्पती तूप, तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, साबुदाणा, मैदा, बटाटे, रताळे, भात, साखर, मिठाई असे पदार्थ आहारामध्ये शक्यतो नसावेत. कारण या सर्व पदार्थांमध्ये जास्त उष्मांक (कॅलरीज) असतात. त्यामुळे या वयात रक्त्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे, वजन वाढणे, हृदयरोग, मधुमेह, संधिवात असे आजार निर्माण होऊ शकतात. साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या, मुरमुरे, सोयाबीनचे फुटाणे, फळांचा ज्यूस, भाज्यांचे सूप, कडधान्य अशा कमी उष्मांक असलेल्या पदार्थांचा आहारात जास्त वापर करावा. चहाऐवजी सकाळ संध्याकाळ साय नसलेले गायीचे दूध प्यावे. त्यामुळे कॅल्शिअमची कमतरता भरून निघते, ज्वारी व नाचणीची भाकरी खावी. गायीचे तूप घ्या. नाचणीमध्ये कॅल्शिअम, लोह व फॉलिक ऍसिड भरपूर प्रमाणात असते. ही भाकरी पचायला हलकी असते. गायीच्या तुपामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल वाढत नाही. सांध्यामध्ये लवचीकता राहाते. त्यामुळे गुडघेदुखी, कंबरदुखी व मलावस्तंभाचा त्रास होत नाही. रोज दोन चोथायुक्त फळे खावीत. उदाहरणार्थ, संत्री, मोसंबी, डाळींब, पपई, सफरचंद इत्यादी. म धुमेह असणार्‍या स्त्रियांनी व जास्त वजन असलेल्या स्त्रियांनी चिकू, सिताफळ, आंबा, केळी ही फळे खाऊ नयेत. या वयात शरीरातील पेशींची झीज होत असते व ही झीज प्रथिनयुक्त आहाराने भरून येते. म्हणून जास्त प्रथिनयुक्त (प्रोटीन्स) आहार घ्यावा याकरिता उकडलेल्या अंड्याचा पांढरा बलक, दूध, डाळी, मोड आलेली कडधान्य, मासे, चिकन, ताक, पनीर अशा पदार्थांचा आहारामध्ये समावेश असावा.. या वयामध्ये दात पडलेले असतील तर कडधान्य उकडून खावीत. वरील सर्व पदार्थ चावता यावेत म्हणून जास्त शिजवावेत. कडधान्याचे, पालेभाज्यांचे, मटण-चिकन सूप असा हलका आहार घ्यावा. यामुळे पचनशक्तीवर ताण येत नाही. सकस पदार्थ मिळाल्यामुळे अशक्तपणाही जाणवत नाही. पोटभर जेवण्यापेक्षा थोड्या-थोड्या अंतराने हलक्या स्वरूपात आहार घ्यावा. शिळे पदार्थ खाऊ नयेत. कारण त्यामुळे जुलाब, उलट्या, अपचन, पित्ताचे विकार, मलावस्तंभ असे आजार होतात. मऊ गुरगुट्या भात, वरण, खिचडी भात, मऊ ज्वारी, नाचणीची भाकरी, बिन तेलाची पोळी, पालेभाजी, उसळ असे जेवण करावे. जेवण करताना गोड, ताजे साखर नसलेले ताक प्यावे. जेवताना सुरुवातीला सूप प्यावे. सहसा या वयात फास्ट फूड खाऊ नये. त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात. बर्‍याच स्त्रिया या वयात शरीर साथ देत नसल्यामुळे बाहेरचे पदार्थ किंवा पटकन होणारे फास्टफूड खातात. परंतु त्यामुळे शरीराचे योग्य पोषण होत नाही. चुकीच्या आहारामुळे अनेक आजार निर्माण होतात. म्हणूनच ताजा व सकस आहार घ्यावा. आयुष्यभर धावपळ केल्यानंतर या वयामध्ये आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वभाव शांत ठेवावा. आध्यात्मिक कार्यामध्ये आवर्जून भाग घ्यावा आध्यात्मिक वातावरणामुळे मनःशांती मिळते. तसेच ॐकार, प्राणायाम, ध्यानधारणा, योगासनांपूर्वीच्या सूक्ष्म क्रिया, मोकळ्या हवेत फिरायला जागे असा व्यायाम करावा. या वयात गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास खूप जाणवतो. व्यायामामुळे हा त्रास कमी होतो. सांध्यांमध्ये लवचीकता निर्माण होते.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400