कधी करावी योगासने?

0
84

योगासनांमुळे आपल्या शरीरात चांगले बदल होतात हे आपण जाणतो. आपली जीवनशैली ताण- तणावाने ग्रस्त आहे. अशा वेळी योगासने आपल्याला मानसिक आणि शारीरिकरित्या आरोग्यदायी ठेवतात. यामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य उत्तम रहातं. अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी योगासनांची ठराविक वेळ हवी, असं काहींचं म्हणणं आहे. मात्र योगा करायची नेमकी वेळ कोणती, ठराविक वेळी योग केल्यानेच लाभ होतात का, याबाबत जाणून घेऊ या. योगासनं सकाळच्या वेळी करायला हवीत, असं काही तज्ज्ञ सांगतात. पण ही बाब प्रत्येकाला लागू पडतेच असं नाही. काहीजण नोकरीसाठी किंवा अन्य कामांसाठी जागरण होतं. काहीजणांना कामानिमित्त रात्री जागरण करावं लागतं. सहाजिकच त्यांना सकाळी उठणं शक्य नसतं. अशावेळी संध्याकाळीही योगा करता येतो. मुळात योगासनांची योग्य अशी वेळ नसतेच. प्रत्येकाने जीवनशैलीनुसार योगाची वेळ ठरवावी. प्रत्येक वेळेचे लाभ आणि दुष्परिणाम आहेत. सकाळच्या वेळात योगा केल्याने दिवसाची चांगली सुरूवात होते. चयापचय क्रिया सुधारते, रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात रहातं आणि दिवसभर पचनसंस्थेचं कार्य उत्तम पद्धतीने सुरू रहातं. सकाळच्या योगामुळे तुमचा मूड चांगला रहातो. उत्साह टिकतो. मनही शांत रहातं. सकाळी योगा केल्याने आपण स्वत:शी जोडले जातो. संध्याकाळी योगा करताना आपण निवांत असतो. शरीरही मोकळं झालेलं असतं. अशावेळी कठीण आसनंही करता येतात. अनेकांना सकाळपेक्षा संध्याकाळी जास्त उत्साही वाटतं. संध्याकाळी योगा केल्याने अन्नपचन होतं. रात्री शांत झोप लागते.