सिगारेटच्या कचर्‍यातून तयार होतात खेळणी!

0
71

आपल्या देशात सिगारेट ओढणार्‍यांचे प्रमाण फोफावले आहे. दिवसेंदिवस वाढणार्‍या या प्रमाणामुळे आरोग्याला धोका उद्भवतोच; पण त्याचबरोबर पर्यावरणालाही हानी पोहोचते. सिगारेटच्या थोटूकांमुळे होणार्‍या कचर्‍याचे प्रमाण वाढत असतानाच त्याची विल्हेवाट लावायची अनोखी तर्‍हा समोर आणली आहे नमन गुप्ता आणि विशाल कानेत यांनी. ‘कोड एंटरप्राइजेस’ ही कंपनी सिगारेटच्या कचर्‍यापासून प्लश टॉइज बनवते. जाणून घेऊ या त्यांच्या प्रवासाबद्दल…

आपल्या आजुबाजुला घडत असणार्‍या छोट्यातल्या छोट्या गोष्टींमधून काहीतरी शिकणं हे खूप कमी जणांना जमतं. नमन आणि विशाल एक दिवस मित्राच्या हॉस्टेल रूममध्ये गप्पा मारत बसले होते. मित्र सिगारेट ओढून थोटूक टाकून देत होते. ‘एका कॅज्युअल संध्याकाळी चार मित्रांच्या ग्रूपमुळे सिगारेटच्या थोटूकांचा एवढा कचरा होऊ शकतो, तर जगभरात दर तासाला लाखो लोकांच्या उरलेल्या सिगारेट्सचा केवढा कचरा होत असेल! आणि या पर्यावरणासाठी घातक असलेल्या कचर्‍याचा निचरा कसा होत असेल?’ असा विचार केल्याचं नमन सांगतो. याच कल्पनेतून नमन आणि विशालने सिगारेटच्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठीचं तंत्रज्ञान तयार केलं. यातूनच ‘कोड एंटरप्राइज’ या कंपनीचा उगम झाला.

विशाल आणि नमनची ही कंपनी सिगारेटच्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी एक केमिकल प्रक्रिया करते. सिगारेटच्या थोटूकांमधील सेल्यूलोज ऍसिटेट रिसायकल करण्याचे काम या प्रक्रियेमध्ये होते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हाती आलेल्या मटेरियलद्वारे सॉफ्ट टॉइज बनवली जातात. या कल्पक कंपनीसाठी दोघांनीही आपला अभ्यास आणि काम सांभाळून कष्ट घेतले. या संकल्पनेवर काम करत असताना नमन दिल्ली विद्यापीठामधून बी. कॉम. करत होता तर विशाल अमेरिकेम धील एका कंपनीसाठी फोटोग्राफी करत होता. गप्पा मारता मारता सुचलेल्या या कल्पनेला त्यांनी कष्ट करून सत्यात उतरवलं. सध्या भारतात सिगारेटमु़ळे होणार्‍या कचर्‍याचे अनेक हानीकारक परिणाम होत आहेत. रस्त्यावर पडलेल्या थोटूकांमुळे प्राण्यांना तर नदी/नाल्यामध्ये पडलेल्या थोटूकांमुळे मासे, अन्य सागरी जीवांना त्रास होतो. कचर्‍याच्या पलीकडे जाऊन हेदेखील प्रश्‍न भेडसावत आहेत हे ओळखून नमन आणि विशालने कोड एंटरप्राइजेसची स्थापना केली. अशा वेगळ्या विचारांनी समाजाचं हित साधणार्‍या तरुणांची नितांत आवश्यकता आहे.