साहित्य सहवास – ‘देहबोली…’

0
47

प्रिय व्यक्ती भेटल्यावर आपल्याला आनंद होतो. आपल्याला झालेला आनंद आपल्या चेहर्‍यावर स्मित हास्याच्या रुपात दिसतो. एखाद्या लहान मुलाने खुपच हट्ट केला म्हणून घरातल्या व्यक्तीने, त्या मुलाला धोपाटलं तर, रडणार्‍या मुलाचा चेहरा अथवा तो मुलगा रागावला आहे, हे त्याच्या चेहर्‍यावरुन लक्षात येतं. ज्यावेळी एखादा उमेदवार इंटरव्यु (मुलाखत) साठी निघतो तेव्हा अगदी चकाचक, छान कसा दिसेल या दृष्टीने स्वतःचे कपडे, व्यवस्थित केसांची सेटिंग करतो. मुलाखतीच्या केबिनमध्ये जातांना रितसर परवानगी घेऊन जातो. मुलाखतकर्त्याने बसण्याची परवानगी दिली की आभार मानतो. त्या विशिष्ट क्षणी तुमची देहबोली मुलाखत घेणाराच्या लगेचच लक्षात येते. प्रश्नाला उत्तर देतांना अथवा माहिती सांगतांना आपण शब्द कसे उच्चारतो यावरुन बोलणं, आवाज लक्षात येतोच परंतू तुम्ही नेमकं कसे बसले आहात? गोंधळलेले आहात का? मुलाखतीचा तणाव चेहर्‍यावर दिसतो का? उत्तरं किती ठामपणे सांगता? माहिती सांगतांना अडखळता का? या सगळ्याच बाबींचा विचार, या विषयीचे गुण मुलाखत घेणारा नोंदवंत असतो. आपला देह बरंच काही बोलत असतो, सांगत असतो, काही शिकवतही असतो. वक्तृत्व स्पर्धेच्यावेळी वक्तृत्व जेवढं महत्वाचं आहे, तेवढीच महत्वाची आहे तुमची देहबोली. आवाजातील चढ- उतार, त्याविशिष्ठ विषयाचा तुम्ही केलेला अभ्यास, आवडेवारी, तुम्ही सदर विषय कोणत्याप्रकारे मांडता, व्यक्त होता, लोकांपर्यंत तो विषय कितपत, कसा पोहोचवता यासाठी देहबोली नक्कीच पाहिली जाते. खरं तर देहबोलीच्या माध्यमातुन आपण एकमेकांसोबत संवाद साधत असतो. जेव्हा एखाद्या परफॉर्मन्समध्ये एकही संवाद नसतो तेव्हा तुमची देहबोली नेमकी, कशी आहे? हे पाहणाराच्या लक्षात येतं. तुमची देहबोली पाहिली की लक्षात येतं तुम्ही स्वतःला नेमकं कसं सादर करणार आहात. म्हणजे अगदी तुमची हुशारी, प्रसंग निभावुन नेण्याची क्षमता, परिस्थितीशी दोन हात करण्याची तुमची कितपत तयारी आहे? तुमची देहबोली ही तुमच्या व्यक्तीमत्वाचा महत्वाचा भाग आहे.

सेलिब्रिटींचे अंगरक्षक पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रथमदर्शनी व्यक्तिमत्व अर्थात देहबोली. आपला देह सहवासात येणारा सोबत निश्चितपणे बोलत असतो, काहीतरी सांगत असतो. स्मितहास्य, मोजक्या तसेच योग्य शब्दात संवाद साधणं, हस्तांदोलन, आपुलकीने केलेली चौकशी ही सगळी देहबोलीची वेगवेगळी आभुषणं. अनपेक्षित संकट आल्यावर तुम्ही नेमकी कशी प्रतिक्रिया देता हे देहबोलीवरुन लक्षात येतं. सौंदर्य प्रसाधनांनी चेहर्‍याचं सौंदर्य नक्कीच वाढवता येतं तसं देहबोलीचं सौंदर्य हे आपण नेमकं कसं वर्तन करतो यावरुन वाढतं. चेहर्‍यावरुन आपली ओळख होते. नाव लक्षात राहातं. तसं देहबोलीतुन तुम्ही तुमची वेगळी ओळख नक्कीच निर्माण करु शकता. देहबोलीचे अनेक प्रकार सांगता येतील. समजा तुमच्यासोबत कुणीतरी काही कारणास्तव भांडत असेल तर नेमकं त्याक्षणी तुमच्या देहबोलीकडे पाहिलं की समोरच्याला लक्षात येईल की तुमची लगेचच कोणती प्रतिक्रिया असणार आहे? तुम्ही भांडणारावर हल्ला करणार आहात की शांत बसणार आहात? हे सगळं तुमच्या देहबोलीवरुन लक्षात येतं. आपली देहबोली ही जेवढी सकारात्मकता, आत्मविश्वासाने असेल तेवढं आपण, नात्याची वीण घट्ट करु शकु, अधिकाधिक प्रगती करु शकु. आपल्या प्रगती अथवा अधोगतीमध्ये देहबोलीचं फारच महत्व आहे. तुम्ही एकाही शब्दाने समोरच्याशी संवाद साधत नसला तरीसुध्दा, तुमचा देह समोरच्याशी बोलतंच असतो.

सुनील राऊत

माळीगल्ली, भिंगार,अ नगर., मो.9822758383