देशभरात लहानग्यांमधील स्थूलतेत प्रचंड वाढ झाली आहे. स्थूलपणा भविष्यात अनेक विकारांना निमंत्रण देतो. विशेषत: शहरी भागातील मुलांमध्ये स्थूलपणा वाढताना दिसतोय. भविष्याच्या दृष्टीनं ही फार गंभीर समस्या आहे. म्हणूनच याकडे वेळेत लक्ष देऊन लहानग्यांच्या स्थूलतेवर उपाययोजना करणं गरजेचं आहे. याबाबत जाणून घेऊ या…
मूल स्थूल आहे हेच आपण स्वीकारत नाही. आपलं मूल बारीकसं असणं आई-वडिलांनाच आवडत नाही. त्यामुळे मुलांच्या स्थूलतेकडे फारसं लक्षही दिलं जात नाही. लहान मुलांमधील स्थूलतेकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर त्यांना भविष्यात मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, आर्थ्रायटिस असे घातक विकार जडू शकतात, असा इशारा तज्ज्ञ मंडळी देतात.
बिस्किटं, चॉकलेट्स, हवाबंद पदार्थांचा भरणा आपल्याकडे असतो. झटपट होणारे ‘रेडी टू इट’ पदार्थ मुलांना दिले जातात. पिझ्झा, बर्गर अशा फास्टफूडच्या अतिरेकामुळे लहानग्यांमध्ये ही समस्या वाढताना दिसतेय. मुलांच्या आहारात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करायला हवा.
स्मार्टफोन, संगणकाचा वापर वाढलाय. अभ्यासाच्या प्रचंड ताणामुळं मुलं मैदानी खेळ कमी खेळतात. घरात बसून टिव्ही बघणं किंवा पीसीवर गेम्स खेळण्यावर त्यांचा भर असतो. जास्त कॅलरीयुक्त भोजन आणि कमी हालचाल यामुळे मुलांमध्ये स्थूलता वाढतेय. त्यामुळे मुलांना मैदानी खेळ खेळायला पाठवायला हवं.
लहान मुलं चॅट करता करता किंवा टीव्ही बघत जेवतात. यामुळे गरजेपेक्षा जास्त अन्न पोटात जातं. मुलांनी खाण्याकडे जास्त लक्ष द्यायला हवं. याची काळजी पालकांनीच घ्यायला हवी.
थायरॉइडमुळेही मुलांमध्ये स्थूलपणाची समस्या उद्भवते. याची चाचणी करून घ्यायला हवी. पालकांनी स्वत:मध्ये काही बदल करून घ्यायला हवेत. मुलांना व्यायाम करायला प्रोत्साहन द्यायला हवं. मुलांना बागेत नेऊन तिथे खेळू द्यायला हवं. यामुळे स्थूलपणाची समस्या दूर होऊ शकेल.