अल्कोहोलिझमशी सामना कसा कराल?

0
62

दारू किंवा अल्कोहोलवरचं अवलंबित्त्व भविष्यात गंभीर स्वरूप धारण करू शकतं. वैद्यकीय भाषेत याला ‘अल्कोहोलिझम’ किंवा ‘अल्कोहोल युझ डिसऑर्डर’ असं म्हटलं जातं. अल्कोहोलिझमची कारणं, दुष्परिणाम आणि त्यावरच्या उपचारांबाबत माहिती करून घेऊ या…

अल्कोहोलिझम म्हणजे काय? हा विकार जडलेल्या व्यक्तीला सतत अल्कोहोलची गरज भासते. दारू सोडण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतात. व्यक्तीच्या कामावर, वैयक्तिक, सामाजिक आणि कौटुंबिक आयुष्यावर याचा विपरीत परिणाम होऊ लागतो. इतर शारीरिक व्याधीही जडू लागतात.

कारणं – दारूचं व्यसन जडण्याची अनेक कारणं असतात. अनुवांशिक, सामाजिक, मानसिक कारणांसोबत आसपासचं वातावरणही याला कारणीभूत ठरू शकतं. अल्कोहोलिझमच्या आधुनिक व्याख्येत याचा संबंध मेंदूशी जोडण्यात आला आहे. मेंदूच्या रचनेत किंवा कार्यात झालेला बदलही याला कारणीभूत ठरू शकतो. काळानुरूप दारूचं व्यसन वाढत जातं. यामुळे मेंदूच्या कार्यात बदल होऊ शकतात.

लक्षणं – अल्कोहोलिझम सौम्य, मध्यम किंवा तीव्र स्वरूपाचं असू शकतं. अल्कोहोल सेवनावर नियंत्रण ठेवता न येणं, प्रयत्न करूनही दारूचं प्रमाण कमी न होणं, दारू सोडण्याचे किंवा कमी करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरणं, दारूचे सामाजिक आणि शारीरिक दुष्परिणाम माहीत असूनही पित राहणं, दारू पिण्यात बराच वेळ घालवणं, कामाच्या आणि कौटुंबिक जबाबदार्‍या पूर्ण करण्यात अडचणी येणं, सामाजिक जी- वनातला सहभाग कमी होणं, दारूच्या नशेत वाहन चालवणंं, दारू सोडण्याचा प्रयत्न केल्यावर मळमळ, उलट्या, चक्कर, घाम अशी लक्षणं जाणवतात.

शारीरिक व्याधी – यकृतात चरबी साठणं, यकृताचा दाह, यकृताच्या टिश्यूंचं न भरून येण्यासारखं नुकसान, उच्च रक्तदाब, हृदयविकार, स्ट्रोक, पचनसंस्थेशी संबंधित विकार, स्वादुपिंडाचा दाह, रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी होणं, गर्भपात, गर्भातल्या बाळाची योग्य वाढ न होणं, गर्भामध्ये शारीरिक व्याधी निर्माण होणं, तोंड, घसा, यकृत, मोठं आतडं, स्तन यांच्या कॅन्सरची शक्यता अनेक पटींनी वाढणं हे दारूच्या अतिसेवनामुळे होऊ शकतात.

उपाय – समुपदेशन आणि कौटुंबिक पाठिंबा यामुळे रुग्ण दारूच्या व्यसनातून लवकर मुक्त होऊ शकतो. वैद्यकीय म दतीने दारू सोडवण्यासाठी प्रयत्न करणं, अल्कोहोलची गरज कमी करणारी औषधं घेणं, शरीराची अस्वस्थता कमी करणारी औषधं घेणं, दारूच्या आहारी जाण्यास कारणीभूत ठरणार्‍या इतर मानसिक आजारांवर उपचार घेणं, ताणतणाव कमी करणं, चांगले छंद जोपासणं यामुळे दारूचं व्यसन सुटू शकतं