डेंटिस्टच्या दारात…

0
25

दाताचं दुखणं सुरू झालं की दंतवैद्याकडे जाणं अपरिहार्य होऊन बसतं. पण दंतोपचार करून घ्यायचं म्हटलं की अनेकांच्या छातीत धडकी भरते. असा डेंटल फोबिया असणारी व्यक्ती दंतवैद्याकडे जाणं टाळण्यासाठी काहीही करू शकते. या व्यक्तींना इतर लोकांच्या तुलनेत दातांशी संबधित आजार होण्याची शक्यता अधिक असते. वेळेआधी दात पडणं, मुख दुर्गंधी अशा विकारांनी डेंटल फोबियाचे रुग्ण नेहमीच त्रस्त असतात. यामागील कारणांचा विचार केल्यास एखाद्याच्या दंतचिकित्सेच्या अनुभवाचा पगडा बसून निर्माण झालेली भीती हेही कारण असू शकतं. डेंटल एंझायटीमध्ये लोक दंतवैद्याकडे जातात, पण चेअरवर बसताच त्यांना कमालीचं अस्वस्थ वाटायला लागतं. वेटिंगरूममध्येच अस्वस्थता अनुभवू लागतात. डेंटिस्टची वेळ घेतल्यानंतर त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात. दंत चिकित्सेदरम्यान छातीत दुखणंं किंवा श्‍वास घ्यायला त्रास होणं अशी लक्षणं दिसून येतात. समुपदेशनाद्वारे या रुग्णांवर उपचार करणं शक्य आहे. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामधील संवाद वाढवण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करणं गरजेचं आहे. रुग्णाने दंतवैद्याकडून उपचार प्रक्रियेची माहिती घ्यावी. त्यासोबतच मनातल्या भीती किंवा शंकांचं निराकरण करून घ्यावं. डेंटल फोबिया किंवा एंझायटीच्या रुग्णांनी उपचार सुरू असताना संगीत ऐकण्याकडे किंवा इतर आवडत्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केल्यास फायदा होतो.