घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद; गुन्हा दाखल, चोरट्याचे पोलिसांसमोर आव्हान
नगर – शहरातील अतिशय वर्दळीच्या असलेल्या स्टेशन रोडवर सक्कर चौक येथील कुंदन सुपर मार्केट दुकानासमोर
रस्त्याच्या कडेला लावलेली हिरो कंपनीची एच एफ डिलस मोटारसायकल (क्र. एम एच १६ बी पी ३६८३)
एका सराईत चोरट्याने अतिशय बिनधास्तपणे भरदिवसा चोरुन नेल्याची घटना ३ मार्च रोजी दुपारी घडली. चोरीची ही
घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या चोरट्याला पकडण्याचे मोठे आव्हान कोतवाली पोलिसांसमोर आहे.
या बाबत सुरज सोमनाथ केदारे (रा.मातोश्री अपार्टमेंट, संभाजी कॉलनी, रेल्वे स्टेशन अ.नगर) यांनी कोतवाली पोलिस
ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी केदारे हे त्यांच्या आईसह सुपर मार्केट येथे किराणा घेण्यासाठी गेले होते. त्यांनी त्यांची
मोटारसायकल दुकानाबाहेर रस्त्याच्या कडेला उभी केलेली होती. फिर्यादी व त्यांची आई हे दोघे दुकानात खरेदी करत असताना एक तरुण चोरटा दुकानात आला. त्याने माल खरेदीचे नाटक केले. काही वेळात फिर्यादी यांचा कानोसा घेत तो काहीही खरेदी न करता दुकानाच्या बाहेर गेला आणि त्याने मोटारसायकलला बनावट चावी लावून ती सुरु करून घेवून निघून गेला. थोड्या वेळाने फिर्यादी दुकानाबाहेर आले असता मोटारसायकल चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच सुपर मार्केट येथील आतील व बाहेरील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता फुटेज मध्ये एक अनोळखी तीस ते पस्तीस वयाचा चोरटा, त्याच्या अंगात काळसर हिरवट रंगाचा चेसचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट,
पायात काळे बूट, डोयास पुढील बाजूस टक्कल पडलेले असा इसम मोटारसायकल चोरून नेताना
दिसून आला. या प्रकरणी सुरज केदारे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. तसेच चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तपास पोलीस हवालदार डाके हे करीत आहे





