पालक शाळा ही विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अभिनव उपक्रम

0
105

नगर – पालकांची शाळा हा आगळावेगळा उपक्रम मेहेर इंग्लिश स्कूलने राबविला आहे. यामुळे पालकांना त्यांच्या मुलांच्या
शिक्षणाविषयी पालकांना मुलांच्या दैनंदिन शिक्षणाविषयी व धोरणांविषयी व शालेय कामकाजाविषयी अधिक माहिती मिळेल.
तसेच शालेय कामकाजात पालकांचा सहभाग वाढेल.  तसेच पालक व शिक्षकांचा संवाद घडेल. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालकांची शाळा हा अभिनव उपक्रम आहे, असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांनी केले आहे.

हिंद सेवा मंडळाच्या मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये  शनिवारी पालक शाळा भरविण्यात आली. जिल्ह्यात प्रथमच पालक शाळा भरल्याने पालकांमध्ये कुतुहल, उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते. शाळेची घंटा वाजली आणि पालक शाळेत दाखल झाले. शाळेमध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच फुग्यांची आकर्षक कमान करुन गुलाब पुष्प देऊन पालकांचे स्वागत करण्यात आले. आलेल्या पालकांना वही व पेनचे वाटप करण्यात आले. यावेळी
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, कार्याध्यक्ष डॉ.रमेश झरकर, मेहेर इंग्लिश स्कूलचे चेअरमन जगदीश झालानी, कार्यकारणी सदस्य प्रा.ज्योती कुलकर्णी, निर्मलाताई भंडारी, शिल्पा धोपावकर, प्राचार्या प्रा.अनुरीता झगडे आदी उपस्थित होते.

जगदीश झालानी म्हणाले, पालक शाळा हा नवीन उपक्रम मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये सुरू करण्यात आला आहे. दर शनिवारी पालकांची शाळा भरविण्यात येईल. मागील आठवड्यात विद्यार्थ्यांनी काय शिक्षण घेतले याची माहिती पालकांना दिली जाईल. पालकांच्या व मुलांच्या अडचणी सोडविण्यात येतील. पालक शाळा या उपक्रमासाठी हिंदसेवा मंडळाच्या सर्व पदाधिकार्‍यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. नगर शहरात पालक शाळा हा उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात आला आहे तसेच सीबीएससी पॅटर्न शाळेत सुरू करण्यात आला आहे. डॉ.रमेश झरकर म्हणाले, एकेकाळी मेहेर इंग्लिश
स्कूलमध्ये विद्यार्थी नव्हते. परंतु चेअरमन जगदीश झालानी यांनी शाळेत राबविलेल्या विविध उपक्रमांमूळे मेहेर
इंग्लिश स्कूलने फिनिस पक्षाप्रमाणे अल्पावधीतच उंच भरारी घेतली आहे. पालकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करून इंग्रजी विषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण  करून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी येथील सर्व शिक्षक कार्यरत आहेत. तसेच
शाळेच्या मुख्याध्यापिका प्रा. अनुरिता झगडे यांनी देखील नविन उपक्रम राबविले आहेत.

ज्योती कुलकर्णी म्हणाल्या, यश मिळवायचे असेल तर प्रयत्न केले पाहिजे. पालकांची शाळा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. प्रा.अनुरीता झगडे म्हणाल्या, पालक शाळा हा उपक्रम राबविण्यासाठी हिंद सेवा मंडळाचे सर्व
पदाधिकारी यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे. तसेच चेअरमन जगदीश झालानी यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
पालकांच्या शाळेमध्ये एरोबिस मेडिटेशन व आरोग्य विषयक माहिती दिली जाईल. या पालक शाळेला
पालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या कार्यक्रमासाठी मेहेर पालक, शिक्षक उपस्थित होते. यावेळी उषा भालेराव यांनी आभार मानले.