नगर – राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांनी मानवता धर्माची शिकवण दिली. रक्तदान हे सुद्धा मानवतेचा धर्म
आहे. एखाद्या व्यक्तीला जीवदान देण्याचे पुण्यकर्म रक्तदानामुळे होऊ शकते. भगवंताला मनुष्याकडे हेच
अपेक्षित असते. साधूसंतही हाच उच्च विचार समाजाला देतात. याच विचारानुसार मर्चंट बँक दरवर्षी आचार्यश्रींच्या पुण्यस्मृतीदिनी रक्तदान शिबीर आयोजित करते. रक्तदानाचा हा महायज्ञ अखंड, अविरत चालू ठेवण्याचा प्रामाणिक
प्रयत्न भविष्यातही चालू राहील असे प्रतिपादन अहमदनगर मर्चंट बँकेचे संस्थापक चेअरमन हस्तीमल मुनोत यांनी केले.
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या ३३ व्या पुण्यस्मृतीनिमित्त अहमदनगर मर्चंट बँके प्रायोजित आणि धार्मिक
परीक्षा बोर्ड, तिलोक आनंद मानव सेवा केंद्र संयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन आनंदधाम भक्तनिवास येथे चेअरमन हस्तीमल मुनोत यांच्या हस्ते झाले. प्रारंभी आचार्यश्रींच्या प्रतिमेस चंदनाचा हार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी अलोकऋषीजी म.सा., अमृतमुनीजी म.सा., धार्मिक परीक्षा बोर्डचे अध्यक्ष नेमीचंद चोपडा (पाली, राजस्थान), पारसमल छाजेड (मुंबई), छवरीलाल कांकरिया (पाली, राजस्थान), माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, महिला बालकल्याण समितीचे उपसभापती मीनाताई चोपडा, मानवसेवा समितीचे डॉ. विजय भंडारी, सह मानदमंत्री सागर गांधी, आनंदराम मुनोत, जनकल्याण रक्त केंद्राचे अध्यक्ष अभय मेस्त्री, मर्चंट बँकेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी व सर्व संचालक आदी उपस्थित होते. यावेळी आ. संग्राम जगताप यांनी रक्तदान शिबिराला भेट देऊन
रक्तदात्यांचे व मर्चंट बँकेचे कौतुक केले.
गणेश भोसले म्हणाले, धार्मिक परीक्षा बोर्ड हा परिसर आमच्या प्रभागातील असल्याने आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्याने या परिसरात चांगली विकास कामे करण्यात आली आहे. याचा आम्हाला आनंद आहे. दरवर्षीप्रमाणे मर्चंट बँक रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मोठे योगदान देत आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त मर्चंट बँक दरवर्षी रक्तदान शिबीर घेऊन मानवसेवेचा आदर्श निर्माण करीत आहे. प्रकाश भागानगरे म्हणाले, मर्चंट बँकेने बँकिंग व्यवसाय करताना नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. रक्तदानाचा अखंड महायज्ञ बँकेच्या सेवाभावाची प्रचीती देते. या कार्यासाठी बँकेचा विशेष पुरस्काराने गौरव झाला पाहिजे. आचार्यश्रींचे समाधीस्थळ
स्थळ असलेले आनंदधाम प्रत्येकाने नतमस्तक व्हावे असे तीर्थस्थळ आहे. हा पवित्र परिसर सुशोभित करण्यात आला असून याठिकाणी येणारे सर्व रस्ते प्रशस्त, सुशोभित आणि हरित करण्यात आला आहे.
प्रास्ताविकात डॉ. विजय भंडारी म्हणाले, गेल्या ३२ वर्षांपासून रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात येत आहे. दरवर्षी आतापर्यंत ३० हजार रक्तदात्यांनी यात योगदान दिले आहे. २३ हजार पुरूष ७ हजार महिलांनी रक्तदान करून आचार्यंश्रींना अभिप्रेत सेवाकार्यात सहभाग नोंदवला आहे. या शिबिराचा सकाळ पासूनच रक्तदात्यांनी प्रतिसाद देत गर्दी केली होती. आनंदऋषीजी ब्लड बँक नगर व पुणे, जनकल्याण रक्तपेढी, जिल्हा रुग्णालय रक्तपेढी, मनपा रक्तपेढीच्या टीमने रक्तसंकलनाचे काम पाहिले. यावेळी अनेक वर्ष सेवा देणारे रतिलाल बोरा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिबिर यशस्वी होण्यासाठी रमेश पितळे, गौतम बोरा, डॉ.रसिक मुथा, बँकेचा सर्व स्टाफ आदींनी परिश्रम घेतले. आनंदराम मुनोत यांनी आभार मानले