नगर – निसर्गाच्या सान्निध्यात राहून शुध्द शाकाहार केल्यास कोणताही आजार आपल्या जवळ फिरकूही शकत नाही, हे अतुल शहा (मुंबई) यांनी ठामपणे आणि स्वानुभवातून सांगितले. स्वस्थ जीवन आणि रोग मुक्तिचा संदेश देणार्या या व्याख्यानाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंदऋषिजी महाराज यांच्या ३३ व्या पुण्य स्मृतीदिन व
१२५ व्या जन्मोत्सवानिमित्त जैन सोशल फेडरेशनने प्रबुध्द विचारक आदर्शऋषीजी महाराज यांच्या
प्रेरणेने सुरू केलेल्या भगवान महावीर व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प ’आहार आणि आरोग्य’ या विषयावर गुंफताना
आनंदधाममध्ये ते बोलत होते. निखिलेंद्र लोढा व सुरेश कटारिया यांच्या हस्ते वत्यांचा सन्मान करण्यात आला. प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. श्री. शहा पुढे म्हणाले, आपल्या आरोग्याबाबत आपण सदैव जागृत राहिले पाहिजे. आपला आहार व विहार निरोगी जीवनाची गुरूकिल्लीच आपल्या हाती देतो. मेडिकल सायन्सकडे उपाय नसलेला आजार मला
झालेला असताना मी आहार शुध्द शाकाहारी घेऊन आजारावर यशस्वीपणे मात करू शकलो. भगवंताने
बनवलेले आपले मानवी शरिर अद्भूत आहे. ते आतूनच आपोआप दुरूस्त होत जाते त्याकरिता औषधं घ्यायची
गरज नसते. ९०% आजार शरीरच बरे करते. आजार एकदम होत नाहीत. त्याची लक्षणे ५ ते १० वर्षे अगोदर
दिसतात. त्याकडे दुर्लक्ष केले तरच आजाराची एन्ट्री होते.
जंगलातील पशु-पक्षी आजारी पडले तर कोणता डॉटर त्यांच्यावर उपचार करतो? असा प्रश्न करून त्यांनी उपस्थितांचे वास्तव परिस्थितीकडे लक्ष वेधले. निसर्गाने उपलब्ध करून दिलेल्या शाकाहारी भोजनापासून माणूस भटकल्याने आजारी पडू लागला. नैसर्गिक भोजन हे अमृत आहे. पृथ्वी (अन्न), जल (पाणी), अग्नि (सूर्यकिरण), वायू (श्वास) आणि आकाश (उपवास) या पंचतत्वांचे संतुलन आपले स्वास्थ उत्तम ठेवते. हे संतुलन बिघडले की माणूस आजारी
पडतो. शरिराच्या क्षमतेपेक्षा जास्त खाणारे सारखे आजारी पडतात. भगवान महावीरांनी सांगितले आहे
की एका हातावर बसेल इतकेच खा. पाणी शरिराची सफाई करते म्हणून थंडीत दररोज दीड लिटर
आणि उन्हाळ्यात दररोज अडीच लिटर पाणी पिलेच पाहिजे. तसेच नियमितपणे किमान २०
मिनिटं प्राणायाम केला पाहिजे. आठवड्यातून किमान एक तास सकाळच्या उन्हात बसलेच
पाहिजे. प्राण्यांमध्ये सर्वांत जास्त बुध्दीमान मानव प्राणी असूनही निसर्गाची साथ सोडत चालल्याने
आणि काय खावे? हे न कळल्याने आजारी पडू लागला आहे. अल्पोपहार करताना सॅलड खा. फलाहार करा.
भाज्यांचा रस काढून प्या. आज भोजन म्हणजे जीभेचे चोचले आणि मनोरंजन झाले आहे. सारखे खाणे आणि
जरूरी नसताना भरपेट जेवणे यामुळे पोट बाहेर येते. पाणीही न पिता उपवास करा. वर्षभरात एकदा आठवडाभर
उपवास करा आरोग्य सुधारेल. आजारमुक्त रहाल. आपल्या देशाची प्रगती आपण आजारमुक्त रहाण्यातून होणार आहे.
एकमेव भारत देशात ताजे भोजन मिळते. चांगले खा. मस्त रहा. आजारमुक्त जीवनाचा आनंद घ्या, असे श्री. शहा
यांनी विविध उदाहरणे देत स्लाईड शो आधारे सांगितले. व्याख्यानास शहरासह उपनगरातील ज्येष्ठ स्त्री-पुरूष
उपस्थित होते. सरोजताई कटारिया यांनी आभार मानले.