हिंदी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत अहिल्यानगरच्या ‘अम्मो’ने मारली बाजी

0
40

१९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अहिल्यानगरचे नाटक अंतिम फेरीत द्वितीय

नगर – ६३ व्या महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत होप फाऊंडेशन, अहिल्यानगर या संस्थेच्या ’अम्मो’ या नाटकासाठी द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी
बुधवारी केली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेत सादर झालेल्या, अरविंद
लिमये यांच्या ’महापात्रा’ या मराठी नाटकाचे हिंदी भाषांतर श्रीनिवास नार्वेकर यांनी केले असून या नाटकाचे दिग्दर्शन शैलेश देशमुख यांनी केले होते. या नाटकासाठी सांघिक द्वितीय क्रमांक तसेच शैलेश देशमुख यांना दिग्दर्शन द्वितीय, वैशाली
गोस्वामी यांना ’अम्मो’ या मध्यवर्ती भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक तसेच शर्वरी अवचट यांना ’दाई’ या पात्रासाठी अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र जाहीर झाले आहे. या नाटकात वैशाली गोस्वामी, श्लोक देशमुख,
पल्लवी दिवटे, देवीप्रसाद सोहनी, महीर कुलकर्णी,
शर्वरी अवचट, अजय लाटे, पूजा जगदाळे, मनुजा
देशमुख, अविष्कार ठाकूर, पुरुषोत्तम उपाध्ये, सागर अलचेट्टी यांच्यासह मंगेश जोशी,
हर्षदा वाघमारे, किरण गायकवाड यांनी भूमिका साकारल्या. गणेश लिमकर यांनी
प्रकाश योजना, नाना मोरे यांनी नेपथ्य, सोहम सैंदाणे यांनी रंगभूषा व वेषभूषा, शैलेश
देशमुख यांनी संगीताची जबाबदारी सांभाळली असून मोनीश ढाळे, प्रसाद भणगे व
शीतल देशमुख यांनी निर्मिती सूत्र सांभाळले.
२६ जानेवारी ते ९ मार्च या कालावधीत पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरु
सांस्कृतिक भवन, नागपूर येथील वसंतराव नाईक स्मृती सभागृह आणि मुंबई येथील
साहित्य संघ मंदिर, गिरगाव, या तीन ठिकाणी संपन्न झालेल्या या स्पर्धेत एकूण ५८
नाट्य संघांनी सहभाग नोंदवत सादरीकरण केले. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून मदन
मिमरोट, मिलिंद दांडेकर आणि श्रीमती मेधा गोखले यांनी काम पाहिले. सांस्कृतिक
कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे,
सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी
विजेत्या नाट्य संघाचे आणि इतर पारितोषिक प्राप्त
कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही
या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी
करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. निकाल जाहीर
होताच नाट्य संघासह अहिल्यानगर मधील अनेक
नाट्यकर्मींनी माऊली सभागृह येथे एकत्र येत
फटायांच्या अतिशबाजीसह जल्लोष करत आनंद
साजरा केला. विजेत्या संघांचे सतीश लोटके, क्षितिज झावरे, संजय दळवी, अनंत
जोशी, प्रसाद भणगे, नितीन जावळे, सदानंद भणगे, प्रसाद बेडेकर, अविनाश कराळे,
चंद्रकांत सैंदाणे, श्रेणिक शिंगवी, संदीप दंडवते आदींनी अभिनंदन केले.
हिंदी राज्य नाट्य स्पर्धेत याअगोदर सन १९९१ साली डॉ. सोमनाथ मुटकुळे यांचे
’दीक्षा’ हे नाटक प्रथम तर १९९२ साली डॉ. मुटकुळेंचेच ’कैफियत’ हे नाटक द्वितीय
आले होते. त्यानंतर १२ वर्षांनी म्हणजे २००४ साली सप्तरंग थिएटर्सचे ’तर्पण’ हे
नाटक तृतीय तर २००५ साली सप्तरंग थिएटर्सचेच ’मृत्युछाया’ हे नाटक प्रथम आले
होते. आणि त्यानंतर आज १९ वर्षांनी शैलेश देशमुख यांच्या ’अम्मो’ या नाटकाने
विजयाची पुनरावृत्ती केली.