डॉटर मिलग्रीड बोरगस यांचे प्रतिपादन; केडगावात रंगला महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम, ब्राझील मधून आलेल्या परदेशी पाहुण्याची उपस्थिती
नगर – होमिओपॅथी, अनेकदा म्हणतो की योग्य उपाय, जेव्हा योग्यरित्या लिहून दिला जातो, तेव्हा तो रुग्णाला सौम्य आणि उत्साही पद्धतीने गुण देऊ शकतो, बरे होईपर्यंत आवश्यक बदल रुग्णात आणू शकतो. बरे वाटण्यासाठी तुम्हाला कधी-कधी उपचाराची देखील आवश्यकता नसते. फक्त वातावरणातील बदल तुम्हाला वेगळे समाधान देऊन जाते. परदेशी लोकांसाठी हे आश्चर्यकारक आणि औषधीपूर्ण आहे. इतर देशातून नागरिक भारतात होमिओपॅथी, आयुर्वेद व योग शिकण्यासाठी येतात. मी तुमच्या शहरात डॉ. लंके यांच्याकडे होमिओपॅथी शिकण्यासाठी आले आहे. उपचार फक्त शारीरिक आजारांना बरे करण्यासाठी नव्हे, तर मन आणि आत्म्याला देखील समाधानी करणारे असावे. यासाठी होमिओपॅथी प्रभावी असल्याचे डॉ. मिलग्रीड बोरगस म्हणाल्या. केडगाव येथील कायनेटिक कॉलनीतील गणेश मंदिर परिसरात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. परिसरातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून आपले कलागुण सादर केले. श्रद्धा रानडे, सुलभा भोसले व सविता मुळे यांच्या पुढाकाराने महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ब्राझीलमधून आलेल्या होमिओपॅथी डॉटर मिलग्रीड बोरगस विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रमोद लंके व रक्षा लंके यांच्यासह स्मीता मराठे, स्मिता घोडके, डॉ. शिल्पा इनमुलवार, सुनीता पाटेकर, साधना डागा,
स्नेहा भोसले, सारीका अकोलकर, सुचीता धामणे, स्वाती कुलट, शैला दहिफळे, बेबी काळे, शकुंतला पवळ, सान्वी इनमुलवार आदींसह परिसरातील महिला उपस्थित होत्या.
प्रारंभी दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमात महिलांनी गीत, भजन, गवळण, लावणी आदींसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मीता मराठे यांनी केले. स्मीता घोडके यांनी आभार मानले.