नगर – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने ५१ पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरवदिनी २७ फेब्रुवारी रोजी गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये केले. या ५१ ग्रंथांमध्ये नगर शहरातील इतिहास संशोधक प्रा.डॉ.नवनाथ काशिनाथ वाव्हळ यांच्या ’अहिल्यानगरचे मानबिंदू’ या ऐतिहासिक ग्रंथाचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने राज्यातील निवडक लेखकांच्या साहित्यकृतीचे प्रकाशन करण्यात आले. प्रा.डॉ. नवनाथ वाव्हळ लिखित ‘अहिल्यानगरचे मानबिंदू’ या पुस्तकास मान मिळाला. प्रा.डॉ. वाव्हळ यांनी अहिल्यानगर परिसरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक मानबिंदूचा संशोधनात्मक, चिकित्सक अभ्यास करून ग्रंथरूपाने मांडणी केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातून निवड झालेल्या ‘अहिल्यानगरचे मानबिंदू’ या ग्रंथाचा समावेश आहे. डॉ नवनाथ वाव्हळ हे न्यू आर्टस् कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. ‘अहिल्यानगरचे मानबिंदू’ या ग्रंथामध्ये आहे आपल्या अहिल्यानगरच्या स्वाभिमानाचे व अभिमानाचे मानबिंदू अस्सल ऐतिहासिक दस्तऐवजाच्या मदतीने
प्रकाशमान केले आहेत. अहिल्यानगर परिसरातील ऐतिहासिक मानबिंदू म्हणजे अहिल्यानगरचा भुईकोट किल्ला, अहिल्यानगरचे गौरव चिन्ह चांदबिबी महाल, अहिल्यानगरचा ताज, फराहबक्ष महाल, अहिल्यानगर- मधील पूर्वीचे जलमहाल हस्त बीहस्त महाल, जगप्रसिद्ध ताजमहालासाठी अहिल्यानगरमधील या वास्तूची नक्षी वापरलेली आहे ती म्हणजे दमडी मज्जिद, अहिल्यानगरच्या (अहमदनगर) स्थापनेपूर्वीचे ग्रामदैवत विशाल गणपती, मुघल सम्राट औरंगजेब बादशहाची कान टोचणी करणारे स्थळ गुरुद्वारा, ब्रिटिश कालीन नावाजलेले चर्च यासारख्या दुर्मिळ धार्मिक वास्तूंचा इतिहास आणि महत्त्व अधोरेखित केले आहे. तसेच सांस्कृतिक विभागांतर्गत जगातील दोन नंबरचे आणि आशियातील एकमेव रणगाडा संग्रहालय, ग्रामीण भारतातील पहिले खाजगी मालकीचे ’तारांगण’, अहिल्यानगरकरांचे तंदुरुस्तीचे पार्क- वाडिया पार्क, आधुनिक निसर्ग सौंदर्यानं नटलेली अहिल्यानगरच्या माळरानाला पडलेले हिरवे स्वप्न साईबन. यासारख्या सांस्कृतिक स्थळांची सखोल माहिती व विश्लेषण दिले आहे… आपल्या मातीचा!., आपल्या गावाचा…, आपल्या गौरवाचा वारसा जाणण्यासाठी वाचलेच पाहिजे असा हा ग्रंथ आहे. एका हाडाच्या इतिहास शिक्षकाच्या ऐतिहासिक ज्ञानाचा अविष्कार अहिल्यानगरचे मानबिंदू या ग्रंथातून दिसून येतो.