नगर – नगर शहरातील इम्पिरिअल चौक येथे बॉम्बे चिकन समोर लावलेली ऑमलेट-पावची हातगाडी चोरी करणारे
२ आरोपी कोतवाली पोलीसांनी पकडले आहेत. त्यांच्याकडून चोरीला गेलेली हातगाडी हस्तगत करण्यात आली
आहे. सागर दिनकर बोठे (रा. ओझर ता. अकोले), निशांत बाळासाहेब पाखरे (रा.अंबरनाथ, कल्याण, दोघेही
हल्ली रा. केदार वस्ती, सोलापुर रोड, अहिल्यानगर) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत आलीम जाफर शेख (रा. बुरुडगांव रोड, अहिल्यानगर) यांनी ६ मार्च रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात
फिर्याद दिली होती. फिर्यादी हे माळीवाडा बसस्थानक उज्वल कॉम्प्लेस समोर आम्लेट पाव गाडी चालवतो. ४ मार्च रोजी
अतिक्रमण पथक आल्याने त्यांनी सदर गाडी इम्पिरिअल चौक येथे बॉम्बे चिकन समोर लावली होती. ती चोरीला गेली
होती. याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर सदर गुन्ह्याचा तपास व आरोपीचा शोध घेत असतांना कोतवाली गुन्हे
शोध पथकाने सदर घटनेचे तांत्रिक विश्लेषण करुन सदरची आम्लेट पाव गाडी आरोपी सागर बोठे व निशांत
पाखरे यांनी चोरी केल्याचे उघड केले. या दोघांना पकडून त्यांच्याकडून आम्लेट-पाव हातगाडी हस्तगत केली.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. योगीता कोकाटे, पो.हे.काँ.
योगेश भिंगारदिवे, सलिम शेख, योगेश कवाष्टे, महिला पो.हे.कॉ.रोहिणी दंरदले, पो.काँ. अमोल गाढे, अतुल काजळे,
दक्षिण मोबाईल सेलचे पो.काँ. राहुल गुंडु यांनी केली आहे.