महाराष्ट्र राज्यातील महायुतीचे सरकार हे औरंगजेबाच्या जुलमी विचाराने चालणारे

0
44

नगर – राज्यातील ट्रिपल सीटचे सरकार हे जुलमी सरकार असून ते औरंगजेबाच्या विचाराने चालत आहे. आता आपल्याला
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांसारखे लढायचे आहे, या माध्यमातून पुन्हा काँग्रेसचे गत वैभव निर्माण करून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अहिल्यानगर शहरात आले असता त्यांचे शहर व जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, दीप चव्हाण, सुनील क्षेत्रे,संपतराव म्हस्के, बाळासाहेब भंडारी, आबासाहेब कोकाटे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणले की’ माणसाने माणसासारखे वागावे, मानवतावादी भूमिका काँग्रेस पक्षाने मांडली आणि इंग्रजां विरोधी लढा पुकारला. महान संविधान निर्माण झाले. दुसरीकडे’मुख्य तत्व बाजूला ठेवून सत्ता मिळवण्यासाठी भाजपने सामाजिक तेढ निर्माण केला. पैशाचा गैरवापर, पारदर्शकतेचा अभाव या माध्यमातून खुर्चीवर बसले, यातून गुन्हेगारी-फुटीरवादी निर्माण झाले. पूर्वी क्रांतीसाठी चळवळ निर्माण व्हायच्या मात्र आता कोयता गँग, आका गँग, मुरूम गँग, वाळू गँग तयार झाले आहेत. हे सर्व नष्ट करण्यासाठी सकारात्मक संदेश  घेऊन काँग्रेस जनतेमध्ये जात आहे, समाजामध्ये द्वेष, गुंडागर्दी पसरली असून संवाद नाहीसा झाला आहे. भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सद्भावना
यात्रेचे आयोजन केले असून मस्साजोग ते बीड अशी सद्भावना यात्रा ८ ते ९ मार्चला संपन्न होणार असून बीड येथे सांगता होणार आहे.
ही सद्भावना यात्रा निवडणुकीसाठी नाहीतर काँग्रेसचे विचार जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी आहे, येणारा काळ हा काँग्रेसचा  असणार आहे, सत्तेसाठी आम्ही हपापलेलो नाही, ट्रिपल इंजिनचे सरकार दररोज एकमेकांमध्ये भांडताना दिसत
आहे हे काय जनतेचे काम करणार असे ते म्हणाले.