इसळक मधील श्री रामलिंगतिर्थ येथे श्री शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा

0
40

ह.भ.प.संदिप महाराज कळसे यांनी केले कथेचे निरूपण

नगर – तालुयातील इसळक येथे प्रभु श्रीरामचंद्र व देवी सिता माता यांच्या पवित्र पदस्पर्शाने पुणीत झालेल्या तसेच श्री समर्थ सद्गुरू योगिराज हरिहर महाराज व श्री संत गाडगे महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत अर्थात श्री
रामलिंगतिर्थ इसळक येथे अखंड शिवनाम महोत्सव तथा ग्रंथराज शिवलिलामृत पारायण व शिवपुराण कथा उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाली. २० फेब्रुवारीपासून हा कार्यक्रम सुरु होऊन त्याची सांगता झाली. या कार्यक्रमाची
दैनंदिनी पहाटे ४ ते ६ काकडा आरती, स.६ ते ८ श्रींचे रूद्राभिषेक पूजन व विष्णुसहस्रनाम, ८ ते १० ग्रंथराज शिवलिलामृत पारायण, सांय ४ ते ५ हरिहर नाम जप, ५ ते ६ हरिपाठ व आरती, रात्री ७ ते ९ शिवपुराण कथा व नंतर महाप्रसाद
अशी होती. शिवपुराण कथेचे निरूपण निंबळक येथील शांत, सुस्वभावी, अभ्यासू व अत्यंत रसाळ वाणी असलेले ह.भ.प.संदिप महाराज कळसे यांनी केले. कथेतील सर्व प्रसंग विषद करताना भावीक भक्तांना अत्यंत साध्या, सरळ व सोप्या भाषेत व अनेक उदाहरणांसह मनुष्य जीवनात शिव शंभू अर्थात श्री महादेवांचे महत्त्व पटवून देत सर्व अबालवृद्ध स्री- पुरूष भावीक भक्तांना गेली ७ दिवस मंत्रमुग्ध केले. ही कथा श्रवण करण्यासाठी पंचक्रोशीतील स्री-पुरूष भाविक-भक्त
दररोज हजर असत. येथील मंदिरांना विद्युत रोषणाई केली होती. मंदिरांच्या समोर व पायर्‍यांवर हजारो तेल वातींच्या दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. महाशिवरात्रीनिमित्त सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत पंचक्रोशीतील भाविक-भक्त दर्शनासाठी दाखल होत होते.  या कार्यक्रमाची सांगता ह.भ.प.मल्लिकार्जुन महाराज सुर्यवंशी यांच्या काल्याच्या किर्तनाने
झाली. येणार्‍या भाविकांसाठी चहा, नाष्टा, दोन वेळेस महाप्रसादाची व्यवस्था गावातीलच दानशूर लोकांनी केलेली होती. हा कार्यक्रम हरिहर महाराज संस्थान ट्रस्ट इसळक यांच्या मार्गदर्शनातून तसेच इसळक-निंबळक मधील तरुण वर्ग, स्वयंसेवक, सरपंच व त्यांचे सहकारी,भक्तगण, विद्यार्थी, भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ इसळक-निंबळक यांच्या सहकार्यातून चांगल्या पद्धतीने झाला.