वादरहित विश्वस्त संस्था निर्माण होण्यासाठी विश्वस्तांमध्ये कायद्याविषयी जनजागृती आवश्यक : पद्मश्री पोपटराव पवार

0
103

नगर – वादरहित विश्वस्त संस्था निर्माण होण्यासाठी विश्वस्तांमध्ये कायद्याविषयी जनजागृती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, अहिल्यानगर आणि श्री ज्ञानेश्वर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट, सावेडी यांच्या संयुक्त विद्यमाने माऊली सभागृह, झोपडी कॅन्टीन, सावेडी, अहिल्यानगर येथे २८/२/२०२५ रोजी आयोजित विश्वस्तांच्या कार्यशाळेत प्रमुख अतिथि व मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहिल्यानगर जिल्हा धर्मादाय उपायुक्त सौ. उषा पाटील होत्या. पुढे बोलताना पद्मश्री पोपटराव पवार ते म्हणाले की, अहिल्यानगर हा विविध प्रमुख देवस्थान तसेच राळेगण सिद्धी, हिवरे बाजार इ. सारख्या आदर्श गावांनी तसेच  सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांनी युक्त असा जिल्हा आहे. देशाला आदर्शदायी अशी व्यक्तिमत्व या जिल्ह्यामध्ये आहेत. विविध सामाजिक चळवळी देखील येथे आहेत. या सर्वांचा आदर्श घेऊन काम करणारे विश्वस्त आपल्याला दिसून येतात, दिवसेंदिवस नवनवीन संस्था, ट्रस्ट नोंदणी होत आहेत, परंतु पुढील कायदेशीर बाबीची माहिती नसल्यामुळे आणि महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० व संस्था नोंदणी अधिनियम १८६० या बाबतीत पुरेशी जनजागृती नसल्यामुळे विश्वस्तांना खूप अडचणींना सामोरे जावे लागते, प्रसंगी दंडात्मक कारवाई तसेच संस्था नोंदणी
रद्द होण्याची नामुष्की देखील ओढवली जाते, यामुळे अशा प्रकारच्या कार्यशाळा वारंवार आयोजित होऊन विश्वस्तांमध्ये
कायदेविषयक साक्षरता निर्माण होणे खूप आवश्यक आहे. तसेच, वेळोवेळी कायदेशीर बाबीची पूर्तता झाली आणि विश्वस्त व्यवस्थेचे व्यवस्थापन पारदर्शक सुरू राहिले म्हणजेच विश्वस्त कायद्याविषयक जागरूक असले तर पुढील वाद टळतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली व आपले अनुभव उपस्थितांसमोर विषद केले. या कायद्याबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे आलेल्या अडचणी देखील त्यांनी सांगितल्यामुळे कायदा माहिती असणे किती आवश्यक आहे, याचे गांभीर्य सर्वांना समजले तसेच सदरच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत तसेच एकच अधिकारी असताना जिल्ह्याच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडल्याबद्दल धर्मादाय उपायुक्त सौ. उषा पाटील यांच्या कामाचे देखील त्यांनी कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणामध्ये सौ. उषा पाटील यांनी विश्वस्तांनी कायदा माहिती करून घेतल्यास व आपणच तयार करून घेतलेली
घटना, नियम व नियमावली समजून घेऊन त्याप्रमाणे न्यासाचे व्यवस्थापन पाहिल्यास व आवश्यक त्या कागदपत्रासह योग्य
प्रकारे प्रकरण दाखल केल्यास अधिकार्‍यांना देखील प्रकरण लवकर निकाली काढण्यास मदत होते व विश्वस्तांना देखील
कार्यालयात जास्त वेळ चकरा माराव्या लागत नाहीत, सदरील कार्यशाळेमुळे विश्वस्तांना योग्य ती माहिती मिळून पुढील
काम सोपे व सुरळीत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यशाळेत सहाय्यक धर्मादाय आयुक्त व्ही. डी. शेंडे यांनी संस्था नोंदणी बाबत मार्गदर्शन. पब्लिक ट्रस्ट प्रॅटिशनर असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गौरव मिरीकर यांनी कलम २२ (बदल अर्ज) यावर मार्गदर्शन केले. न्यायिक प्रकरणांच्या कोर्ट फी स्टॅम्प बाबत कार्यालयाच्या अधीक्षक श्रीमती व्ही. पी. सुरकूटला यांनी माहिती दिली. कार्यालयाचे निरीक्षक यू. एम. ढोले यांनी हिशोब पत्रके दाखल करावयाच्या कार्यपद्धती व त्यासंबंधातील इतर माहिती दिली. अ‍ॅड. विजय मुनोत यांनी कलम ४१ बाबत सविस्तर माहिती दिली. स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी यांनी शासनाचे विविध धोरण आणि संस्थांनी करावयाची पूर्तता यासह सामाजिक क्षेत्रातील अनुभव विश्वस्तासमोर मांडले. प्रास्ताविक धर्मादाय उपायुक्त सौ. यू. एस. पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन भार्गव भारदे आणि अ‍ॅड. शीतल रनशूर यांनी केले. या कार्यक्रमामध्ये सौ. यू. एस. पाटील यांनी दोन अधिकार्‍यांच्या जागा रिक्त असतांना कार्यालयाची जबाबदारी
व्यवस्थित पार पडत ६५९ नवीन नोंदणी, ८४ वादाचे प्रकरण, ११८९ विनावादाचे प्रकरण अशी एकूण १९२२ प्रकरण एकाच सन २०२४ सालामध्ये निकाली काढलेली असून विविध देवस्थानच्या विश्वस्तांच्या निवडी देखील पारदर्शकपणे केलेल्या असल्याने पब्लिक ट्रस्ट प्रॅटिशनर असोसिएशनच्या वतीने पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. वाबळे राजेंद्र, योगेश मांडोत, संतोष गायकवाड, नदीम सय्यद, वैभव साबळे, गवळी, जायभाय, काळे अर्जुन, दिपनाईक, नजन ई. वकील हजर होते सदरील कार्यक्रमासाठी अहिल्यानगरमधून विविध संस्थांचे प्रतिनिधि विश्वस्त उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील कर्मचारी व पब्लिक ट्रस्ट प्रॅटिशनर असोसिएशनचे सर्व वकील मंडळींनी कष्ट घेतले.