झेंडीगेट परिसरातील अनधिकृत कत्तलखाने, अतिक्रमणे हटविली

0
61

महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई

नगर – महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने २४
फेब्रुवारीला सकाळी शहरातील झेंडीगेट परिसरातील खाटिक गल्ली
येथे असलेले २ अनधिकृत कत्तलखाने जमीनदोस्त केली आहेत.
याशिवाय परिसरातील अतिक्रमणेही हटविली आहेत.
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून गेल्या काही
दिवसांपासून शहरात व उपनगरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरु आहे.
या पथकाने २४ फेब्रुवारीला सकाळी झेंडीगेट परिसरातून कारवाईला
सुरुवात करण्यात आली. प्रारंभी महापालिकेच्या जागेत पार्किंगसाठी
खाजगी व्यक्तीने केलेले पत्र्याचे शेड काढण्यात आले. त्यानंतर
खाटिक गल्ली येथे असलेले २ अनधिकृत कत्तलखाने जेसीबीच्या
सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले.
त्यानंतर पथकाने बूथ हॉस्पिटल ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोस्ट ऑफिस जवळील
खाद्य पदार्थ व इतर टपर्‍या, अशोक हॉटेल परिसरातील टपर्‍या व इतर अतिक्रमणे काढण्यात आली
आहेत. दुपारी उशिरापर्यंत ही मोहीम सुरु होती. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला
होता.
सदर कारवाई आयुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ,
उपअभियंता सुरेश इथापे, मुख्यालय क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख, प्रभाग अधिकारी श्याम गोडळकर,
क्षेत्रीय अधिकारी देविदास बिज्जा, अमोल चावक यांच्या सह अतिक्रमण विभागातील कर्मचार्‍यांनी केली.

नागरिकांनी अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावीत –

आयुक्त यशवंत डांगे शहरात व उपनगर परिसरात अतिक्रमण मोहिमेसाठी महानगरपालिका प्रशासनाने महिनाभराचे
नियोजन केलेले आहे. त्याची माहितीही वेळापत्रकासह सार्वजनिक करण्यात आलेली आहे. यापूर्वीही
मागील एक – दोन महिन्यात महानगरपालिकेने अतिक्रमणांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती.
गेल्या दोन महिन्यात ४८५ अतिक्रमणे व ७५५ हून अधिक अनधिकृत बॅनर, होर्डिंग हटवण्यात आले
आहेत. आता पुन्हा शहरामध्ये कारवाई सुरू करण्यात आली आहे.
महानगरपालिकेने दिलेल्या वेळापत्रकानुसार व नियोजनानुसार अतिक्रमण कारवाई सुरू राहणार
आहे. नागरिकांनी अतिक्रमण केले असल्यास, ते तात्काळ काढून घ्यावे. अनधिकृत कत्तलखान्यावर
कारवाईबाबत पोलिस प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कत्तलखान्यावरही कारवाई
सुरू करण्यात आली आहे. अनधिकृत कत्तलखाने तत्काळ काढून घ्यावेत, अन्यथा कारवाईला सामोरे
जावे लागेल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे. दरम्यान, यापुढे
अतिक्रमण हटाव मोहीम केवळ कार्यालयीन वेळेत सीमित न राहता पहाटे सहा वाजल्यापासून रात्री बारा
वाजेपर्यंत चालूच राहणार असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.