प्रा.विलास कथुरे यांची प्रमुखपदी : योगेश दोडके यांची माहिती
नगर – अहिल्यानगरमध्ये २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान
झालेल्या ६७ वी वरिष्ठ राज्य अजिंयपद महाराष्ट्र केसरी कुस्ती
स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी खुल्या गटातील गादी विभागाच्या अंतिम
फेरीमध्ये पै. पृथ्वीराज मोहोळ व पै. शिवराज राक्षे यांच्यात कुस्ती
झाली. ही कुस्ती मोहोळ यांनी जिकल्याने त्यांची महाराष्ट्र केसरी
किताबासाठी गादी विभागातून निवड झाली होती. मात्र मोहोळ
विरोधात राक्षे या कुस्ती वरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे ही कुस्ती मोहोळ यांनी जिंकल्याचा
आरोप कुस्ती क्षेत्रात होत आहे. याबाबत शिवराज राक्षे यांनी अद्याप
राज्य कुस्तीगीर संघाकडे कोणतीही तक्रार किंवा चौकशीसाठी अर्ज
दिलेला नाही. मात्र पंचांवर जाहीरपणे आरोप व नाराजी व्यक्त होत
असल्याने राज्य कुस्तीगीर संघाने मोहोळ व राक्षे यांच्यात झालेल्या
लढतीची सखोल चौकशी करण्यासाठी सक्षम तज्ञ समितीची नेमणूक
करण्यात आली आहे. या समितीच्या प्रमुखपदी शिवछत्रपती पुरस्कार
प्राप्त व कुस्तीचे आंतरराष्ट्रीय पंच प्रा.विलास कथुरे यांची नितुक्ती
करण्यात आली आहे. त्यांच्या बरोबर ४ तज्ञ पदाधिकार्यांचीही
नियुक्ती करण्यात आली. ही समिती वादग्रस्त ठरलेल्या लढतीतील
पंचांच्या निर्णयाची सखोल चौकशी करून २८ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्र
राज्य कुस्तीगीर संघाकडे अहवाल सादर करणार असल्याची माहिती
राज्य कुस्तीगीर संघाचे सचिव, हिंद केसरी पै.योगेश दोडके यांनी
दिली.
याबाबत योगेश दोडके यांनी काढलेल्या पत्रकात म्हंटले आहे
की, अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गादी
विभागाची अंतिम लढत पै. पृथ्वीराज मोहोळ व शिवराज राक्षे यांच्यात
झाली होती. या कुस्तीस पंच म्हणुन छत्रपती संभाजीनगर येथील
आंतराष्ट्रीय पंच नितीश काबीलिये, मॅट चेअरमन म्हणुन शासकीय
कोच पै. दत्तात्रय माने व साईड पंच म्हणुन विवेक नाईकलब यांची
नेमणुक करण्यात आली होती. सदर कुस्तीच्या निकालावरून बराच
गदरोळ निर्माण झाला. स्पर्धा संपल्यानंतर जनमानसात सुध्दा
निकालावरून नाराजी व्यक्त होत आहे.
सदर निकालाच्या विरूध्द पै. शिवराज राक्षे यांनी आजपर्यंत
कोणतीच लेखी हरकत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडे नोंदवली
नाही. परंतु समाजात सदर निकालाबाबत होत असलेल्या उलट
सुलट चर्चेचा विचार करता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने
याबाबत ५ जणांची चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
या चौकशीच्या प्रमुखपदी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व कुस्तीचे
आंतरराष्ट्रीय पंच प्रा.विलास कथुरे यांची नेमणुक करण्यात आली
असुन त्यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय पंच प्रा.दिनेश गुंड पुणे व सुनिल
देशमुख जळगाव, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू पै.नामदेव बडरे
सांगली व राष्ट्रीय खेळाडू विशाल बलकवडे नाशिक यांची नियुक्ती
करण्यात आली आहे. ही समिती वादग्रस्त ठरलेल्या लढतीतील
पंचांच्या निर्णयाची सखोल करून २८ फेब्रुवारीपर्यंत अहवाल महाराष्ट्र
राज्य कुस्तीगीर संघाकडे सादर करणार आहे.