नगर – भिंगार मधील भरबाजारपेठेतील किराणा दुकान चोरट्यांनी रात्रीच्या वेळी फोडून आतील सामनाची उचकापाचक करत दुकानातील ३० हजारांची रोकड, ३० हजार ५०० रुपये किमतीचा सुकामेवा व इतर साहित्य चोरून नेल्याची घटना ११ फेब्रुवारीला रात्री ९ ते १२ फेब्रुवारीला सकाळी ९ या कालावधीत नेहरू मार्केट परिसरात घडली आहे.
याबाबत निलेश पोपटलाल शिंगवी (वय ४०, रा. वसंत बंगला, सौरभ नगर, पंडित हॉस्पिटल जवळ, नागरदेवळे) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शिंगवी यांचे भिंगार मध्ये नेहरू मार्केट परिसरात शिंगवी प्रोव्हिजन स्टोअर्स नावाचे दुकान आहे. शिंगवी यांनी ११ फेब्रुवारीला रात्री ९ वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते घरी गेले. १२ फेब्रुवारीला सकाळी ते दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे शटर चे कुलूप तोडलेले तसेच शटर उचकटलेले दिसले. त्यांनी आत जावून पाहणी केली असता आत मध्ये सर्वत्र उचका पाचक झाल्याचे दिसले. त्यांनी दुकानात ठेवलेली रोख रक्कम पाहिली असता ती दिसून आली नाही. या शिवाय दुकानातील १२ किलो काजू, १५ किलो बदाम, १० किलो मनुके,५ किलो काळे मनुके, ५ लिटरचे तेलाचे सहा कॅन, अर्धा किलो वजनाचे चहाचे १५ पुडे असा ६० हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज आढळून आला नाही.
शिंगवी यांनी रात्री दुकान बंद केल्यावर रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरच्या वरील बाजूचा छताचा पत्रा उचकटला. त्यातून आत प्रवेश करत रोकड व साहित्य चोरले. त्यानंतर शटर चे कुलूप तोडत तसेच शटर उचकटत तेथून पोबारा केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. याबाबत त्यांनी भिंगार कॅम्प पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळाल्यावर स.पो.नि. जगदीश मुलगीर, स.फौ. दहिफळे यांच्या सह पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.
या बाबत निलेश शिंगवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३४ (१) अन्वये चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार दहिफळे हे करीत आहे.
महिनाभरापासून भिंगार परिसरात चोऱ्यांचे सत्र
भिंगार शहर आणि परिसरात गेल्या महिना दीड महिन्यापासून चोऱ्यांचे सत्र सुरु आहे. चोरट्यांनी किराणा दुकाने, मेडिकल दुकाने टार्गेट करत चोऱ्या केल्या आहेत. काही चोरीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदही झाल्या आहेत. मागील महिन्यात ज्या चोऱ्या झाल्या त्याच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळून आलेल्या चोरट्यामध्ये साम्य आढळून आलेले आहे. त्यामुळे चोऱ्या करणारी ही टोळी एकच आहे की वेगवेगळ्या टोळ्या आहेत. याचा पोलिसांनी तातडीने छडा लावून या चोरट्यांना जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.





